पिंपरी (Pclive7.com):- मोशी येथील कचरा डेपो परिसरात झालेल्या दुर्घटनेप्रकरणी पिंपरी-चिंचवड महापालिकेने अखेर कायदेशीर पाऊल उचलले आहे. महापालिकेच्या वतीने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली असून, ॲटोनी लारा रिन्यूएबल एनर्जी प्रा. लि.चे प्रकल्प प्रमुख अशोककुमार सियाराम शरण गुप्ता आणि सेफ्टी अधिकारी विजय रामराव सपकाळ यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आवश्यक सुरक्षा उपाययोजना न केल्याने नऊ जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा आरोप दोघांवर करण्यात आला आहे.

मोशी कचरा डेपो परिसरात ८ जुलै २०२६ रोजी दुपारी साडेएकच्या सुमारास ही दुर्घटना घडली होती. कचऱ्याचा ढिगारा इमारतीवर आणि शेजारील रस्त्यावर ढासळल्याने तेथे काम करणाऱ्या व्यक्तींच्या जीविताला गंभीर धोका निर्माण झाला. या दुर्घटनेत नऊ जणांचा मृत्यू झाला, तर १२ जण जखमी झाल्याची नोंद पोलीस अहवालात करण्यात आली आहे.

शहरातून संकलित करण्यात येणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे कंत्राट महापालिकेने ॲटोनी लारा रिन्यूएबल एनर्जी प्रा. लि. या कंपनीला दिले आहे. पावसाळ्यात एसएलएफला धोका पोहोचू नये यासाठी त्याची तपासणी करणे आणि संभाव्य धोके टाळण्यासाठी आवश्यक त्या सुरक्षा उपाययोजना करणे ही संबंधित कंपनीची जबाबदारी असल्याचे महापालिकेच्या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

सुरक्षा उपाययोजना न केल्यास मानवी जीविताची हानी होऊ शकते, याची माहिती असतानाही प्रकल्प प्रमुख अशोककुमार गुप्ता आणि सेफ्टी अधिकारी विजय सपकाळ यांनी आवश्यक उपाययोजना केल्या नाहीत, असा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या कथित निष्काळजीपणामुळे एसएलएफचा काही भाग ढासळून नऊ जणांचा मृत्यू झाल्याचा ठपका संबंधित अधिकाऱ्यांवर ठेवण्यात आला आहे.
महापालिकेच्या वतीने सोहन मधुकर निकम यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३६७/२०२६ नोंदविण्यात आला असून भारतीय न्याय संहिता कलम १०५, १२५ (ए), १२५ (बी) आणि ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





















Join Our Whatsapp Group