पिंपरी (Pclive7.com):- औद्योगिक क्रीडा संघटनेची सर्वसाधारण सभा व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ नुकताच ढोले पाटील रोड येथील कपिला बिझनेस हॉटेल येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमास पिंपरी-चिंचवड, चाकण, तळेगाव आणि पुणे परिसरातील विविध औद्योगिक कंपन्यांचे खेळाडू, प्रतिनिधी तसेच क्रीडा क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्ता शेळके यांनी केले. संघटनेचे पदाधिकारी प्रदीप वाघ यांनी प्रास्ताविक करत मागील वर्षाचा आढावा व आर्थिक अहवाल सादर केला. प्रमुख पाहुणे ॲम्युनेशन फॅक्टरीचे ॲडिशनल जनरल मॅनेजर अनुपकुमार यांचा संघटनेचे अध्यक्ष व आंतरराष्ट्रीय गोल्फपटू राजेंद्र नागेशकर, उपाध्यक्ष नरेंद्र कदम आणि सचिव वसंत ठोंबरे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

२०२५-२६ या वर्षातील विविध क्रीडा स्पर्धांमध्ये टाटा मोटर्सने ३१ गुणांसह सर्वसाधारण विजेतेपद, तर बजाज ऑटो आकुर्डीने २७ गुणांसह उपविजेतेपद पटकावले. टाटा मोटर्सतर्फे स्पोर्ट्स कमिटीचे अध्यक्ष शशिकांत कात्रे व एचआर-स्पोर्ट्स मॅनेजर नितीन कदम यांनी विजेतेपदाचा करंडक स्वीकारला. तर बजाज ऑटोचे एचआर व स्पोर्ट्स मॅनेजर अतुल काळोखे यांनी उपविजेतेपदाचा करंडक स्वीकारला. यावेळी संघटनेचे २०२६-२७ चे क्रीडा वेळापत्रक देखील जाहीर करण्यात आले.
सत्काराला उत्तर देताना अनुपकुमार यांनी सांगितले की, “खेळामुळे मानसिक तणाव कमी होतो आणि ऊर्जा वाढते. त्यामुळे प्रत्येकाने नियमितपणे खेळात सहभागी व्हावे. ६२ वर्षांची औद्योगिक क्रीडा संघटना कामगार क्षेत्रातील खेळाडूंना आपले कौशल्य सिद्ध करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे, ही अभिमानास्पद बाब आहे.”

संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र नागेशकर यांनी सांगितले की, २०२५-२६ मध्ये संघटनेच्या १४ स्पर्धांमध्ये सुमारे २५० कंपन्या आणि २,५०० हून अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदविला. तसेच यंदा प्रथमच महिला क्रिकेट आणि पासिंग व्हॉलीबॉल या स्पर्धांचा समावेश करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
यावेळी विविध स्पर्धांना प्रायोजकत्व देणाऱ्या कंपन्यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विजय हिंगे, हरी देशपांडे, प्रदीप वाघ, दुष्यंत गायकवाड, संतोष शिंदे, अशोक त्यागी, दयानंद प्रक्षाले, अतुल काळोखे, सचिन कांबळे, गिरीश गायकवाड, मंदार कुलकर्णी, अनिकेत आवटे, राहुल चावरिया, कृष्णा कोले, मिनीनो कार्डोझ आणि वल्लभ मेंगाळे यांनी विशेष योगदान दिले. कार्यक्रमाच्या शेवटी वसंत ठोंबरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.





















Join Our Whatsapp Group