पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे सौदागर येथील एका मेडिकल स्टोअरमध्ये तब्बल ७३ लाख २१ हजार ७९४ रुपयांच्या अपहाराचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात कर्मचारी दिग्विजयसिंग प्रवीणसिंग राजपूत (रा. संतोष नगर, ताथवडे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. शिववर्धन मोहनलाल अग्रवाल (वय ५१, प्राधिकरण निगडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून दिग्विजयसिंग राजपूत याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१६(४), ३१८(४) तसेच इतर संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीनुसार, आरोपी हा पिंपळे सौदागर येथील लोटस ड्रग स्टोअर या मेडिकल व्यवसायात नोकरी करत होता. सन २०१९ ते जानेवारी २०२६ या कालावधीत त्याने विश्वासाचा गैरफायदा घेत मेडिकलमधील औषध विक्रीची ५२ लाख ५४ हजार ५३२ रूपये रक्कम स्वतःच्या बँक खात्यात वळविली. तसेच रोख विक्रीतील ३३ लाख ६० हजार ७६५ रुपये एवढी रक्कमही स्वतःकडे ठेवून एकूण ७३,२१,७९४ रुपयांचा अपहार केल्याचा आरोप आहे.

हा प्रकार उघडकीस आल्यानंतर फिर्यादी यांनी सांगवी पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून सहायक पोलीस निरीक्षक पाटील हे पुढील तपास करीत आहेत.





















Join Our Whatsapp Group