पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची मुख्य सॉफ्टवेअर प्रणाली गेल्या आठ दिवसांपासून बंद असल्याने नागरिकांची विविध कामे खोळंबली असून महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजावरही मोठा परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर नगरसेवक संदीप वाघेरे यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना निवेदन देत तात्काळ हस्तक्षेप करण्याची तसेच संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

संदीप वाघेरे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सॉफ्टवेअर प्रणालीच्या देखभालीची जबाबदारी असलेल्या कंत्राटदार कंपनी आणि संबंधित आयटी विभागाकडून झालेल्या दुर्लक्षामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे जन्म-मृत्यू दाखले, विवाह नोंदणी प्रमाणपत्रे, मालमत्ता कर व पाणीपट्टी भरणे, विविध परवाने आणि इतर ऑनलाइन सेवा पूर्णपणे ठप्प झाल्या आहेत. परिणामी नागरिकांना गेल्या आठ दिवसांपासून मोठा मनस्ताप सहन करावा लागत असून महापालिकेच्या कार्यालयात वारंवार फेऱ्या माराव्या लागत आहेत.

याशिवाय महापालिकेच्या अंतर्गत फाईल्सची देवाणघेवाण, ई-गव्हर्नन्स प्रणाली तसेच दैनंदिन प्रशासकीय कामकाजावरही विपरीत परिणाम झाला आहे. अनेक विकासकामांशी संबंधित निर्णय आणि प्रशासकीय प्रक्रिया रखडल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. ऑनलाइन कर संकलन बंद असल्याने महापालिकेच्या महसुलालाही मोठा फटका बसत असून कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

नगरसेवक संदीप वाघेरे यांनी आयुक्तांकडे खालील मागण्या केल्या आहेत :
बंद पडलेली सॉफ्टवेअर प्रणाली युद्धपातळीवर तात्काळ पूर्ववत सुरू करावी.
करारातील अटींचा भंग करणाऱ्या संबंधित कंत्राटदार कंपनीवर दंडात्मक कारवाई करून आवश्यक असल्यास काळ्या यादीत समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरू करावी.
कामकाजावर योग्य देखरेख न ठेवणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर प्रशासकीय कारवाई करावी.
“नागरिकांना अखंडित व दर्जेदार सेवा उपलब्ध करून देणे ही महापालिकेची प्राथमिक जबाबदारी आहे. आठ दिवसांपासून संपूर्ण प्रणाली बंद राहणे ही अत्यंत गंभीर बाब असून यासाठी जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे,” असे संदीप वाघेरे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.
दरम्यान, या प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून महापालिका प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून सर्व ऑनलाइन सेवा पूर्ववत सुरू कराव्यात, अशी मागणी विविध स्तरांतून होत आहे.





















Join Our Whatsapp Group