पिंपरी (Pclive7.com):- जमीन खरेदी-विक्री व्यवहाराशी संबंधित तक्रार अर्ज निकाली काढण्यासाठी पाच लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी चाकण उत्तर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षकाविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणातील आरोपी पोलीस अधिकारी तानाजी शिवाजी कदम असल्याचे समोर आले आहे. एसीबीच्या माहितीनुसार, पुणे परिसरातील 54 वर्षीय व्यावसायिक आणि त्यांच्या मुलाविरोधात जमीन व्यवहारासंदर्भातील दोन तक्रार अर्ज चाकण उत्तर पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. या अर्जांची चौकशी तानाजी कदम यांच्याकडे सोपविण्यात आली होती.

तक्रारदाराने एसीबीकडे 13 मे 2026 रोजी तक्रार दाखल केली होती. तक्रार अर्ज दिवाणी स्वरूपाचे असल्याचे दाखवत ते निकाली काढण्यासाठी सुरुवातीला 10 लाख रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आल्याचा आरोप आहे. पडताळणीदरम्यान तडजोडीनंतर ही रक्कम 5 लाख रुपयांवर निश्चित झाल्याचे निष्पन्न झाले. ही रक्कम दोन टप्प्यांत देण्याचे ठरले होते. त्यानुसार प्रथम अडीच लाख रुपये आणि संबंधित काम पूर्ण झाल्यानंतर उर्वरित अडीच लाख रुपये देण्याची मागणी करण्यात आली होती.

एसीबीने केलेल्या पडताळणीत लाचेची मागणी झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर तानाजी कदम यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू आहे.





















Join Our Whatsapp Group