पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहरातील वाढती गुन्हेगारी, ढासळलेली कायदा व सुव्यवस्था आणि अपुऱ्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळे विद्यमान पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांची तात्काळ उचलबांगडी करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) शहर कार्याध्यक्ष इंजि. देवेंद्र तायडे यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात तायडे यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड हे राज्यातील महत्त्वाचे औद्योगिक, शैक्षणिक आणि रोजगाराचे केंद्र असले तरी गेल्या काही काळात शहरातील गुन्हेगारी घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. विषारी दारू प्रकरण, महिलांवरील अत्याचार, विनयभंग, छेडछाड, खून, टोळीगिरी, खंडणी, मादक पदार्थांची विक्री तसेच गोळीबाराच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

देहूरोड परिसरातील खून, राजकीय नेत्याची हत्या, चिंचवड व संत तुकारामनगर परिसरातील वाहनांची तोडफोड यांसारख्या घटनांमुळे गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरलेला नसल्याचे चित्र निर्माण झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच शहरातील प्रमुख रस्त्यांवर खुलेआम सुरू असलेला देहविक्रीचा व्यवसाय, अवैध गुटखा विक्री, मटका, लॉटरी आणि इतर बेकायदेशीर धंद्यांवर प्रभावी कारवाई करण्यात पोलीस यंत्रणा अपयशी ठरत असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे.
सध्याच्या पोलीस आयुक्तांनी रात्री १० नंतर विविध निर्बंध लागू केले असले तरी त्याचा गुन्हेगारीवर अपेक्षित परिणाम झालेला नसून सामान्य नागरिक, कर्मचारी, व्यावसायिक, विद्यार्थी आणि महिलांना त्याचा त्रास सहन करावा लागत असल्याचे तायडे यांनी नमूद केले आहे. गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याऐवजी सर्वसामान्यांवर निर्बंध लादले जात असल्याची भावना नागरिकांमध्ये असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्थेची उच्चस्तरीय चौकशी, विषारी दारू प्रकरणासह गंभीर गुन्ह्यांच्या तपासासाठी विशेष पथकाची नियुक्ती, संवेदनशील भागांमध्ये विशेष गुन्हेगारीविरोधी मोहीम, अवैध धंद्यांवर कठोर कारवाई आणि पोलीस यंत्रणेवरील जनतेचा विश्वास पुनर्स्थापित करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.
तसेच पिंपरी-चिंचवड शहरातील सध्याची गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन विद्यमान पोलीस आयुक्तांची तात्काळ उचलबांगडी करून त्यांच्या जागी सक्षम, कर्तव्यदक्ष आणि जनहिताला प्राधान्य देणाऱ्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात यावी, अशी प्रमुख मागणी इंजि. देवेंद्र तायडे यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.




















Join Our Whatsapp Group