राष्ट्रवादीतील नाराजांची खदखद दूर करू – दिलीप वळसे पाटील
पिंपरी (Pclive7.com):- पुणे विधानपरिषद निवडणुकीच्या उमेदवारीवरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नाराजीचे सूर उमटू लागले असताना माजी आमदार विलास लांडे यांच्या घरी माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी भेट दिल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. विक्रम काकडे यांना केवळ आर्थिक निकषाच्या आधारे उमेदवारी देण्यात आल्याचा आरोप करत लांडे यांनी पक्ष नेतृत्वावर थेट टीका केली होती. त्यानंतर वळसे पाटील यांनी लांडे यांची भेट घेतल्याने ही नाराजी दूर करण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा रंगली आहे.

मात्र, या भेटीबाबत बोलताना दिलीप वळसे पाटील म्हणाले की, “मी विलास लांडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आलो आहे. ते नाराज नाहीत,” असे स्पष्ट केले. तसेच पुणे विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षात काही नेते नाराज असतील, तर त्यांची खदखद दूर करण्यासाठी योग्य मार्ग काढला जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

यावेळी बोलताना वळसे पाटील यांनी सुनील टिंगरे यांचा अर्ज हा डमी अर्ज असल्याचे सांगितले. तसेच कोणतीही वेगळी भूमिका घेत असल्याची माहिती आपल्यापर्यंत नसल्याचे नमूद केले. त्यामुळे महायुतीतून पुणे विधानपरिषद निवडणुकीत कोणतीही बंडखोरी होणार नाही, असा दावा त्यांनी केला.
दरम्यान, विलास लांडे यांनी उमेदवारी निवडीच्या प्रक्रियेवर उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे राष्ट्रवादीतील अंतर्गत नाराजी पुन्हा एकदा चर्चेत आली असून आगामी काळात पक्ष नेतृत्व या नाराज नेत्यांची कशी समजूत काढते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.




















Join Our Whatsapp Group