पिंपरी (Pclive7.com):- फुगेवाडी येथे विषारी दारू प्रकरणात मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांची केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी बोलताना त्यांनी अवैध दारू व्यवसायाविरोधात कठोर कारवाईची आवश्यकता व्यक्त केली.

रामदास आठवले म्हणाले की, प्रशासनाकडून दारूच्या हातभट्ट्या उद्ध्वस्त केल्या जातात, मात्र काही काळानंतर त्या पुन्हा सुरू होत असल्याची वस्तुस्थिती आहे. त्यामुळे अशा अवैध व्यवसायांचे कायमस्वरूपी उच्चाटन करण्यासाठी प्रभावी यंत्रणा उभी करण्याची गरज आहे.

विषारी दारूमुळे मृत्यू झालेल्या कुटुंबांबद्दल शोक व्यक्त करताना त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना तातडीने कंत्राट पध्दतीने रोजगार उपलब्ध करून द्यावा, त्यानंतर नियमित प्रक्रियेनुसार पुढील निर्णय घ्यावेत, अशी मागणी राज्य सरकारकडे केली.

देशातील विविध भागांमध्ये केमिकलयुक्त व विषारी दारूची विक्री होत असल्याने अनेक निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. अशा दुर्घटना पुन्हा घडू नयेत यासाठी अवैध हातभट्ट्यांवर कायमस्वरूपी बंदोबस्त करणे ही काळाची गरज असल्याचेही आठवले यांनी नमूद केले. विषारी दारू प्रकरणातील पीडित कुटुंबांना न्याय मिळावा आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

Tags: Ramdas Aathavale




















Join Our Whatsapp Group