पिंपरी (Pclive7.com):- श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर १५ जून २०२६ पासून भाविकांच्या दर्शनासाठी पुन्हा खुले करण्यात येणार असल्याची माहिती प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी गजानन पाटील यांनी दिली आहे. मंदिर परिसरात सुरू असलेल्या नवीन सभामंडप उभारणी व पायवाट मार्गाच्या कामामुळे मंदिर गेल्या काही महिन्यांपासून दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले होते.

सन २०२७ मध्ये नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आणि भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन मंदिर परिसरात विविध विकासकामे सुरू आहेत. मंदिरासमोरील नवीन सभामंडपाचे काम ३१ मेपर्यंत पूर्ण होणार असून, भाविकांसाठी आवश्यक सुविधा, स्वच्छता आणि गर्दी व्यवस्थापनासाठीची पायाभूत कामे १५ जूनपर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. मंदिर प्रशासन, स्थानिक ग्रामस्थ आणि भाविकांच्या सहकार्यामुळे अवघ्या पाच महिन्यांत ही महत्त्वाची कामे पूर्णत्वास आली असून, याबद्दल प्रशासनाने सर्वांचे आभार मानले आहेत.

दर्शनासाठी विशेष नियम..
मंदिर व्यवस्थापन समितीचे अधिकृत संकेतस्थळ – https://shreebhimashankar.com
५ जून २०२६ पासून ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू होणार.
दररोज १,००० भाविकांना प्रवेश दिला जाणार.
नोंदणीकृत भाविकांची यादी संकेतस्थळावर उपलब्ध राहणार.
१५ जून ते ३० जून २०२६ या कालावधीत दररोज सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत दर्शनाची सुविधा उपलब्ध राहील.
दर्शनासाठी येताना वैध ओळखपत्र सोबत आणणे अनिवार्य असेल.

भाविकांनी तसेच स्थानिक नागरिकांनी मंदिर संस्थान, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन आणि स्थानिक यंत्रणांना सहकार्य करण्याचे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी गजानन पाटील यांनी केले आहे. मंदिर परिसरातील सर्व कामे अंतिम टप्प्यात असून, भाविकांना अधिक सुरक्षित, स्वच्छ आणि सुविधायुक्त दर्शन व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने प्रशासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.




















Join Our Whatsapp Group