पिंपरी (Pclive7.com):- आयपीएलमध्ये खेळणे हे प्रत्येक क्रिकेटपटूचे स्वप्न असते. पिंपरी चिंचवडच्या ऋतुराज गायकवाड याचे हे स्वप्न पूर्ण झाले आहे. त्याची चेन्नई सुपर किंग्ज संघात निवड झाली आहे. शहरातून आयपीएलमध्ये निवड झालेला तो पहिला खेळाडू आहे. त्याच्यावर सर्वच स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
अवघ्या २१ वर्षांच्या ऋतुराजचे शिक्षण पिंपळे निलख येथील विलास नांदगुडे हायस्कुलमध्ये झाले आहे. त्याने क्रिकेटचे धडे थेरगावमधील व्हेरॉक-वेंगसरकर अकादमीतून गिरवले. ऋतुराजचे वडील दशरथ गायकवाड हे डिफेन्समध्ये नोकरी करत असून आई सविता गायकवाड ह्या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेत शिक्षिका आहे.
ऋतुराज उजव्या हाताने फलंदाजी करतो. त्याने प्रथम श्रेणी कसोटी क्रिकेटमधील ९ सामन्यांच्या १६ डावांमध्ये ६७३ धावा केल्या आहेत. त्याची यामध्ये सर्वोत्तम धावसंख्या १२६ होती. त्याने भारतीय ‘अ’ संघातून खेळताना २९ सामन्यांमध्ये १३७८ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याची १३२ सर्वोत्तम धावसंख्या आहे. त्याने ३ शतक आणि १० अर्धशतक ठोकली आहेत. टी-२० प्रकारामध्ये त्याने ५ सामन्यांमध्ये १३१ धावा केल्या आहेत. त्यामध्ये त्याची सर्वाधिक धावसंख्या ५२ होती.
आयपीएलमध्ये ही ऋतुराजकडून अशाच कामगिरीची सर्वजण अपेक्षा करत आहेत. नगरसेवक हर्षल ढोरे यांनी ऋतुराजच्या घरी जाऊन निवडीबद्दल अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात.






















Join Our Whatsapp Group