पिंपरी (Pclive7.com):- शिक्षक वर्गीकरण विषयावरून पिंपरी चिंचवड माहापालिकेच्या महासभेत गोंधळ झाल्याने सभा आज दि.२० रोजी ५ वाजेपर्यंत तहकूब करण्याची नामुष्की सत्ताधारी भाजपवर ओढावली.
सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर राहुल जाधव होते. नोव्हेंबर महिन्याची तहकूब सभा आज (गुरुवारी) सुरू झाली. विषय पत्रिकेवरील सहा क्रमांकाचा शिक्षक वर्गीकरणाचा विषय मांडला जात होता. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून याविषयावर चर्चेची मागणी करण्यात आली. मात्र, सत्ताधारी भाजपने मागणी धुडकावून लावत सातव्या क्रमांकाचा विषय घेतला. त्यामुळे संतप्त झालेल्या विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी महापौरांच्या आसनासमोर धाव घेतली.
विरोधकांना बोलू दिले जात नाही. मानधनावरील शिक्षक भरती प्रक्रियेत भ्रष्टाचार झाला. काही पदाधिकाऱ्यांनी पाच ते दहा लाख रुपये घेतले. याविषयावर आम्हाला बोलायचे होते. मात्र, भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर येईल म्हणून आम्हाला बोलू दिले नाही, असा आरोप दत्ता साने यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी केला. गोंधळ वाढत चालल्याने अखेर ही सभा आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत तहकूब ठेवण्यात आली आहे. तासाभरातच सभा तहकूब करण्याची नामुष्की भाजपवर ओढावली. चालू डिसेंबर महिन्यातील सभेला सुरूवात झाली आहे.






















Join Our Whatsapp Group