पिंपरी (Pclive7.com):- वाकड पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने उत्कर्ष चौक परिसरातील बंद फ्लॅटमध्ये झालेल्या घरफोडीचा यशस्वी छडा लावत एका सराईत गुन्हेगारासह चार जणांना अटक केली आहे. आरोपींकडून सुमारे १० लाख ३४ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून घरफोडीचे पाच गुन्हे उघडकीस आले आहेत.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्कर्ष चौक परिसरातील बंद फ्लॅटमध्ये चोरी झाल्यानंतर वाकड पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू केला. या तपासादरम्यान वाकड येथील इराणी कॅफेजवळून मुख्य आरोपी अतुल उर्फ आट्या चंद्रकांत आमले याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे केलेल्या कसून चौकशीतून मोहन उर्फ आबा मुजमुले, भीमराव गंगावणे आणि रामेश्वर उपल्ले या त्याच्या साथीदारांची नावे समोर आली. त्यानंतर पोलीसांनी विविध ठिकाणी सापळा रचून तिघांनाही अटक केली.

आरोपींकडून ९७.८५ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण १० लाख ३४ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे वाकड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या घरफोडीच्या पाच गुन्ह्यांची उकल झाली आहे.
दरम्यान, मुख्य आरोपी अतुल उर्फ आट्या आमले हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध पिंपरी-चिंचवड, पुणे शहर, पुणे ग्रामीण, अहिल्यानगर आणि लातूर जिल्ह्यांमध्ये एकूण ४४ गुन्हे दाखल आहेत. पोलीसांकडून आरोपींची अधिक चौकशी सुरू असून आणखी काही घरफोडीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

सदरची कारवाई ही वाकड पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अंबरीश देशमुख, श्रीनिवास दराडे, सहायक पोलीस फौजदार संदीप गवारी, पोलीस हवालदार चंदु गिरे, दिपक साबळे, विजय घाडगे, हनुमंत कांबळे, विजय भुसारे, सचिन गायकवाड, पोलीस अंमलदार ज्ञानदेव झेंडे, कौतेंय खराडे, विक्रम भगत, समाधान कांबळे, अभिषेक मांडे, प्रमोद गायके व मंगेश लोखंडे यांनी केली आहे.





















Join Our Whatsapp Group