मोशी कचरा डेपोवर भोसरी मतदारसंघाशिवाय कचरा नको; पिंपरी, चिंचवड मतदारसंघातील कचरा टाकण्यास तीव्र विरोध
पिंपरी (Pclive7.com):- मोशी कचरा डेपो दुर्घटनेनंतर शहरातील कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न ऐरणीवर आला असून, आता या विषयावर मोशी परिसरातील लोकप्रतिनिधींनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मोशी कचरा डेपोवर केवळ मोशी अर्थात भोसरी विधानसभा मतदारसंघातीलच कचरा टाकावा आणि पिंपरी व चिंचवड विधानसभा मतदारसंघातील कचरा येथे डंप करू नये, अशी ठाम मागणी नगरसेवक निखिल शिवाजी बो-हाडे यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना दिलेल्या निवेदनात बो-हाडे यांनी म्हटले आहे की, मोशी कचरा डेपोवर ८ जुलै २०२६ रोजी कचऱ्याचा डोंगर वेस्ट टू एनर्जी प्रकल्पावर कोसळून भीषण दुर्घटना घडली. या घटनेत नऊ कामगारांचा मृत्यू झाला असून, अनेक कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेनंतरही शहरातील वाढत्या कचऱ्याचा भार मोशीवरच टाकण्याचा प्रयत्न होत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, १९८२ पासून शहरातील कचऱ्याची विल्हेवाट मोशी येथे लावली जात असून, आज शहराची लोकसंख्या ४० लाखांच्या घरात पोहोचली आहे. शहरात दररोज सुमारे १,५०० मेट्रिक टन कचरा निर्माण होत असून, त्यातील मोठा हिस्सा मोशी कचरा डेपोवर जमा होतो. त्यामुळे परिसरातील नागरिकांना आरोग्य, पर्यावरण आणि सुरक्षिततेच्या गंभीर समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

मोशी परिसरातील नागरिकांनी गेली अनेक दशके शहराचा कचरा सहन केला असून, आता अन्य मतदारसंघातील कचरा मोशीत आणण्याचा कोणताही निर्णय स्वीकारला जाणार नाही, असा इशारा देखील निवेदनातून देण्यात आला आहे. पिंपरी आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघांसाठी स्वतंत्र व पर्यायी कचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
महापालिका प्रशासनाने अन्य मतदारसंघांतील कचरा मोशी येथे टाकण्याचा निर्णय घेतल्यास स्थानिक नागरिक, सर्व नगरसेवक आणि ग्रामस्थांच्या वतीने तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा बो-हाडे यांनी दिला आहे. प्रसंगी कचरा डेपोच्या प्रवेशद्वारांवर ठिय्या आंदोलन करून निषेध नोंदविण्यात येईल, असेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे.
दरम्यान, मोशी कचरा डेपो दुर्घटनेनंतर शहरातील कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न अधिकच चिघळला असून, आगामी काळात हा मुद्दा राजकीय आणि सामाजिक स्तरावर अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत. महापालिका प्रशासन या मागण्यांवर काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
“आमची भूमिका स्पष्ट आहे. मोशी कचरा डेपो हा भोसरी मतदारसंघाच्या हद्दीत असून, येथील नागरिकांनी पुरेसा त्याग केला आहे. पिंपरी आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघांसाठी स्वतंत्र आणि शाश्वत कचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारणे ही महापालिका प्रशासनाची जबाबदारी आहे. मोशीकरांच्या आरोग्याशी, पर्यावरणाशी आणि सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड होऊ देणार नाही. प्रशासनाने आमच्या मागण्यांची दखल घेतली नाही, तर स्थानिक नागरिक, ग्रामस्थ आणि सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींसह लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन उभारले जाईल. मोशीकरांच्या सहनशीलतेचा अंत झाला असून, आता न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच राहील.”– निखिल बो-हाडे, नगरसेवक, भाजपा, मोशी.





















Join Our Whatsapp Group