पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी विधानसभा मतदारसंघातील आकुर्डी, दत्तवाडी या भागातील मतदार यादी क्रमांक ४३ ते ७२ मधील नागरिकांची बीएलओंकडून पिळवणूक, छळवणूक होत आहे. एका कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयात बोलविले जाते. काही बीएलओंनी परस्पर खासगी लोकांची या कामासाठी नियुक्ती केली आहे. यातून नागरिकांच्या माहितीचा गैरवापर होऊ शकतो. अशा बीएलओंवर तातडीने कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक प्रमोद कुटे यांनी केली आहे.

नगरसेवक कुटे म्हणाले, निवडणूक आयोगाच्या नियमानुसार बीएलओंनी प्रत्येक मतदाराच्या घरी जाऊन पडताळणी करणे अपेक्षित आहे. मात्र, पिंपरीतील अनेक भागांत बीएलओंकडून मतदारांना नगरसेवकांच्या कार्यालयात, पक्षांच्या संपर्क कार्यालयात, सार्वजनिक बागेत किंवा शाळांमध्ये बोलावून अर्ज भरून घेतले जात आहेत. नागरिकांना एका कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयात बोलविले जाते. ‘बीएलओंनी केंद्रावर जाणे किंवा संबंधित मतदारांच्या घरी जाऊन फॉर्म भरुन घेणे अपेक्षित आहे. त्याऐवजी बीएलओंकडून नागरिकांची पिळवणूक केली जात आहे. काही बीएलओंनी परस्पर खासगी लोकांची या कामासाठी नियुक्ती केली आहे. यातून नागरिकांच्या माहितीचा गैरवापर होऊ शकतो. त्यामुळे अशा बीएलओंवर कारवाई करावी. संबंधित अधिकाऱ्यांनी या त्रुटींमध्ये तत्काळ सुधारणा करावी.

ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि कामगारांसाठी ही प्रक्रिया अधिक जिकरीची ठरत आहे. जन्माचा दाखला, नागरिकत्वाचा पुरावा आणि इतर कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी अनेकांना वारंवार फेऱ्या माराव्या लागत आहेत. निवडणूक आयोगाने बीएलओंना घरभेटी करून अर्ज भरून घेण्यास सांगितले आहे. मात्र, ते जात नसल्याचे दिसत आहे. शासकीय आदेशानुसार बीएलओंनी मतदारांच्या दारात सेवा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही नगरसेवक प्रमोद कुटे यांनी केली आहे.





















Join Our Whatsapp Group