राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिन्ही नगरसेवकांचे महावितरणच्या अधिकाऱ्यांना साकडे
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी विधानसभा मतदारसंघातील प्रभाग १४ आकुर्डीमधील अनेक भागातील वीजपुरवठा सातत्याने खंडित होत आहे. महावितरणकडून आवश्यक कामांसाठी निधी उपलब्ध नसल्याचे सांगितले जाते. स्थानिक आमदार, जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला जाईल. परंतु, वीजपुरवठा खंडित होऊ देऊ नका असे साकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिन्ही नगरसेवकांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना घातले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक प्रमोद कुटे, नगरसेविका वैशाली काळभोर, नगरसेविका अरुणा लंगोटे यांनी आकुर्डीतील सातत्याने वीजपुरवठा खंडित होत असल्याबाबत महावितरणच्या भोसरी विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली. सामाजिक कार्यकर्ते गणेश लंगोटे यावेळी उपस्थित होते. प्रभाग १४ आकुर्डीमधील मोहननगर, काळभोरनगर, रामनगर, दत्तवाडी, विठ्ठलवाडी, विवेकनगर, चिंचवड स्टेशन, साईबाबा नगर, शुभश्री सोसायटी, येशवर्या सोसायटी, क्रांतीनगर या भागात वारंवार वीज पुरवठा खंडित होतो. त्यामुळे नागरिक खूप त्रस्त झाले आहेत. नागरिकांचा आक्रोश दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे वीजपुरवठा खंडित होण्याची समस्या तत्काळ दूर करावी. वीजपुरवठा सुरळीत करावा.

संबंधित कामे करण्यासाठी निधीची कमतरता असेल तर कामे करण्यासाठीचे अंदाजपत्रक तयार करून द्यावे. विधानसभा उपाध्यक्ष, पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांचा स्थानिक निधीतून काही निधी उपलब्ध केला जाईल. उपमुख्यमंत्री, पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या माध्यमातून जिल्हा नियोजन समितीतूनही निधी उपलब्ध करुन दिला जाईल, अशी भूमिका तिन्ही नगरसेवकांनी मांडली. या संदर्भात लवकरच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेण्यात येणार असल्याचे नगरसेवकांनी सांगितले.





















Join Our Whatsapp Group