(अजितदादा पवार यांचा २२ जुलै हा जन्मदिवस. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ‘पिंपरी-चिंचवडचे सत्ताकारण’ या पत्रकार बाळासाहेब जवळकर यांच्या पुस्तकातील एक प्रकरण संपादित स्वरूपात…)
पिंपरी (Pclive7.com):- अजित पवार.. महाराष्ट्राच्या राजकारणात केंद्रस्थानी असणारे प्रमुख नाव.. परखड स्वभाव, कामाचा प्रचंड उरक, प्रशासनावर पकड.. अर्थमंत्री, पालकमंत्री, विरोधी पक्षनेता, उपमुख्यमंत्री अशी विविध पदे उपभोगलेला आणि मुख्यमंत्री पदाची प्रचंड क्षमता असणारा लोकनेता..
मूळ बारामतीचे असलेले अजित पवार १९९१ पासून पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात सक्रिय होते.
तत्कालीन लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून ते निवडून आले होते. शहरवासीयांच्या दृष्टीने अगदीच नवखे. स्वत:ची कोणत्याही प्रकारची ओळखपाळख नसताना ‘पवार साहेबांचा पुतण्या’ या एकमेव कारणास्तव अजितदादांना भरघोस मतदान झाले. भाजपच्या विरोधात ते साडेतीन लाख मतांच्या फरकाने निवडून आले होते. काँग्रेस पक्षातून निवडून आलेल्या देशभरातील खासदारांमध्ये सर्वाधिक मताधिक्य तेव्हा अजितदादांचे होते.

तरूण वयातच खासदार झाल्यापासून ते अगदी शेवटपर्यंत अजितदादांचा पिंपरी-चिंचवडशी थेट संबंध राहिला होता. बारामती आणि अजित पवार हे जसे अतूट समीकरण होते. त्याचपध्दतीने, पिंपरी-चिंचवड शहराचा अजित पवारांशी अतिशय निकटचा संबंध होता. कार्यकर्त्यांचे मोठे जाळे, शहरातील विकासकामे, सततचा संपर्क, वैयक्तिक पातळीवर ओळखी अशा अनेक कारणांमुळे अजितदादा पिंपरी-चिंचवडकरांना आपलेसे वाटत होते. अजितदादांचा राजकीय बालेकिल्ला म्हणूनच पिंपरी-चिंचवडकडे पाहिले जात होते.
सुरुवातीला शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व नंतर प्रा. रामकृष्ण मोरे यांच्यासोबत अजितदादा पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात सक्रिय होत गेले. प्रारंभी पिंपरी-चिंचवडमध्ये बस्तान बसवताना अजितदादांना बऱ्याच अडचणी आल्या. मोरे समर्थक सुरुवातीला अजितदादांना सहकार्य करत नव्हते. हळूहळू अजितदादांनी त्यांच्याशी जुळवून घेतले.
शरद पवार यांनी १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली, तेव्हा काँग्रेसचा मोठा गट राष्ट्रवादीत दाखल झाला. पदार्पणातच राष्ट्रवादीचे पिंपरी-चिंचवड शहरातील बळ जास्त होते.
अजितदादांच्या नेतृत्वाखाली २००२ मध्ये राष्ट्रवादीने पिंपरी पालिका निवडणुका स्वबळावर लढवली, तेव्हा काँग्रेस हाच प्रतिस्पर्धी पक्ष होता. १०५ जागांपैकी सर्वाधिक ३६ जागा राष्ट्रवादीने जिंकल्या. तर, काँग्रेसने प्रा. मोरे सरांच्या नेतृत्वाखाली ३२ जागा जिंकल्या. बहुमतासाठी आवश्यक ५३ चा आकडा कोणाकडेच नव्हता. नाईलाजाने राष्ट्रवादीला काँग्रेसची मदत घ्यावी लागली. त्यासाठी पालिकेतील सत्तेचा निम्मा वाटा द्यावा लागला. दोन्ही पक्षात कायम कुरबुरी होत राहिल्या. शह-काटशह, एकमेकांवर कुरघोड्या करतच त्यांनी पाच वर्षे कारभार केला.
२००३ मध्ये प्रा. मोरे यांचे निधन झाले. त्यानंतर, काँग्रेस पक्षाची वाताहत झाली. बहुतांश काँग्रेस नेते, नगरसेवक, प्रमुख कार्यकर्त्यांनी अजितदादांचे नेतृत्व स्वीकारून राष्ट्रवादीत प्रवेश केला.

२००७ आणि २०१२ च्या पिंपरी पालिकेच्या निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेसने स्वःबळावर लढवल्या आणि स्पष्ट बहुमताने जिंकल्या. दोन्हीही निवडणुकीत अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने विरोधकांना भुईसपाट केले. अपक्ष निवडून आलेले नगरसेवक दोन्ही वेळी राष्ट्रवादीशी सलग्न राहिले.
या काळात, खऱ्या अर्थाने पिंपरी-चिंचवड शहरात अजित पवार युग सुरू झाले होते. अजितदादा शहराचे सर्वेसर्वा बनले आणि ते म्हणतील तीच पूर्व दिशा, असे वातावरण होते. अनेक चांगले अधिकारी त्यांनी महापालिका आयुक्त म्हणून आणले. त्यांचा पुढे जाऊन शहर विकासासाठी उपयोग झाला. आमदार, महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष, विषय समित्यांची सभापती पदे, नगरसेवक अशी अनेक पदे देत अजितदादांनी कित्येकांची राजकीय पायाभरणी केली. असंख्य जणांची आर्थिक भरभराट झाली. खायला महाग असलेले कित्येकजण करोडपती झाले. कार्यकर्ते सशक्त झाल्याने पक्षाचीही ताकद वाढली होती.
अजितदादा अत्यंत परखड स्वभावाचे असल्याने त्यांचे शाब्दिक फटकारे सहन करावे लागत होते. एकाधिकारशाहीपासून ते हुकूमशाहीपर्यंत अनेक विशेषणे पवारांना लावली गेली. मात्र, याच अजितदादांच्या नेतृत्वाखाली शहराचा कायापालट झाला. पिंपरी-चिंचवडकरांनी अजितदादांच्या कामांचा झपाटा अनेकदा पाहिला. सकाळी सहा वाजताच शहरातील विकासकामांची पाहणी करणारे अजितदादा नेहमीच चर्चेचा विषय ठरले. शहरात पाणी नाही, रस्त्यावर अस्वच्छता, बांधकामांचा दर्जा निकृष्ट आढळून आला की, अजितदादांनी थेट आयुक्तांची कानउघडणी केल्याची अनेक उदाहरणे आहेत.
शहरविकासासाठी कोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत, त्यांचा अजितदादांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे शहरवासीयांसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व सुधारणा टप्याटप्प्याने आणि वेगाने होत गेल्या. शहरातील मोठमोठे प्रकल्प, प्रशस्त रस्ते, उड्डाणपूल अशी भरीव विकासकामे अजितदादांच्या सत्ताकाळात मार्गस्थ झाली. दापोडी ते निगडी हा १२ किलोमीटरचा थेट रस्ता केवळ अजित पवारांच्या भक्कम पाठबळामुळे होऊ शकला.
अजित पवारांच्या नेतृत्वाखाली पिंपरी-चिंचवडला नवी ओळख मिळाली. पिंपरी-चिंचवडच्या विकासाचे मॉडेल इतर शहरांसाठी अनुकरणीय ठरत होते. या कामगिरीची दखल पिंपरी-चिंचवडसह राज्यभरात घेतली गेली. अजितदादांच्या कट्टर विरोधकांनीही पिंपरी-चिंचवडच्या विकासाबद्दल त्यांचे कौतुकच केले व त्यांचे श्रेय मान्य केले. एकीकडे शहराचा वेगाने विकास होत असतानाच, पिंपरी पालिका भ्रष्टाचाराचे कुरण बनले होते. विकासाच्या गोंडस नावाखाली भ्रष्टाचाराने कळस गाठला होता. सत्तारूढ राष्ट्रवादीच्या स्थानिक कारभारी नेत्यांनी व त्यांच्या निकटवर्तीयांनी पालिकेला लूटण्याची कोणतीही कसर सोडली नाही. त्यामुळे पक्षाची लक्तरे चव्हाट्यावर टांगली गेली. त्याचा एकत्रित परिणाम म्हणजे, २०१७ च्या महापालिका निवडणुकीत पिंपरी-चिंचवडकरांनी राष्ट्रवादीला नाकारले. भ्रष्ट कारभारामुळे सत्ता तर गेलीच, आधी केलेल्या शहरविकासांच्या कामांवर अक्षरश: बोळा फिरला.
पिंपरी पालिकेत भाजपची सत्ता आली. राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्यांचा भरणा अधिक होता.
अजितदादांनी ताकद देऊन राजकारणात मोठे केलेल्यांनी राष्ट्रवादीला पराभवाची धूळ चारली. २०१२ च्या पालिका निवडणुकीत, भाजपचे अवघे ३ नगरसेवक होते. त्यांची संख्या २०१७ च्या निवडणुकीत थेट ७७ वर (१२८ पैकी) गेली. त्यानंतर, भाजप हा शहरातील सर्वात प्रबळ पक्ष बनला. ज्या अजितदादांनी वर्षानुवर्षे पिंपरी-चिंचवड शहरावर एकहाती राज्य केले, त्यांच्या राष्ट्रवादीचे संख्याबळ २०१७ मध्ये ८३ वरून ३६ पर्यंत घसरले. हा पराभव अजित पवारांच्या दृष्टीने धक्कादायक होता.
पिंपरी-चिंचवड शहराचा चेहरामोहरा बदलण्यात अजित पवार यांचे महत्त्वपूर्ण योगदान असतानाही शहरवासीयांनी त्यांचे नेतृत्व नाकारले. कारण, अजितदादांच्या अनुयायांनी पिंपरी-चिंचवडची ‘खाऊगल्ली’ करून टाकली होती. राष्ट्रवादीचा भ्रष्ट कारभार शहरातील सजग नागरिक उघड्या डोळ्यांनी पाहत होते. ठराविक मंडळींकडे पक्षाचा पूर्ण कारभार होता, त्याचा जबर फटका पक्षाला बसला होता. महापालिका हातातून गेल्यानंतर दोनच वर्षात, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत अजितदादांना दुसरा मोठा धक्का बसला.
मावळ लोकसभेच्या निवडणुकीत त्यांचे पुत्र पार्थ पवार यांचा दारूण पराभव झाला. पार्थ निवडून येण्यासाठी अजितदादांनी बऱ्याच गोष्टी जुळवून आणत सोयीस्कर राजकीय गणित मांडले होते. शहरातील विविध घटकांशी अनेक वर्षे संबंध असल्याने ते सर्व आपल्यासोबत राहतील, असा अजितदादांना विश्वास होता. पोषक वातावरण दिसल्याने पार्थ निवडून येईल, असे अजितदादांना खात्रीपूर्वक वाटत होते. मात्र, तसे झाले नाही. मोदी लाटेचा पुन्हा लाभ झाल्याने शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे सलग दुसऱ्यांदा निवडून आले.
पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीतील अनेकांनी ‘दिवसा एक, रात्री एक’ असा दुहेरी प्रचार केला. पालिकेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची माया जमा करणाऱ्या राष्ट्रवादीतील अनेकांनी पार्थच्या निवडणूक खर्चासाठी स्वतःच्या खिशात हातच घातला नाही. ‘वरून’ येणाऱ्या पैशांकडे ते डोळे लावून बसले होते. आलेल्या त्या पैशांचे वाटपही व्यवस्थितरीत्या झाले नाही. ‘अजितदादांच्या जवळचे’ म्हणवणाऱ्यांनीच विरोधी प्रचार केला.
दुसरीकडे, स्थानिक अस्मितेच्या मुद्द्यावर भूमिपुत्र एकटवले, त्याचाही फायदा बारणे यांना झाला.
आधी पिंपरी पालिका हातातून गेली. नंतर पार्थचा पराभव झाला, पिंपरी-चिंचवडसाठी आपण इतके काही केले, तरीही शहरवासीयांनी आपल्याला व मुलालाही नाकारले, याचे दु:ख अजितदादांना बराच काळ होते.
(मार्च २०२३)





















Join Our Whatsapp Group