पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या वाहतूक शाखेने शालेय विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या वाहनांवर विशेष मोहीम राबवत धोकादायक पद्धतीने वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांविरोधात कारवाई केली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत ही संयुक्त विशेष मोहीम राबविण्यात आली.

पोलिस आयुक्तालयाच्या निर्देशानुसार वाहतूक शाखा, प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) आणि संबंधित विभागांच्या संयुक्त पथकांनी २९ जून, ३० जून, २ जुलै आणि २० जुलै २०२६ रोजी विविध भागांत तपासणी मोहीम हाती घेतली. या मोहिमेत वाकड, सांगवी, भोसरी, चिंचवड, तळवडे आणि हिंजवडी वाहतूक विभागांच्या हद्दीत शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यात आली. या चार दिवसांच्या मोहिमेदरम्यान एकूण १८१ वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ६९ वाहनांवर कारवाई करण्यात आली. संबंधित वाहनचालकांकडून ३ लाख ७६ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

ही कारवाई पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलिस आयुक्त शशिकांत महावर, अतिरिक्त पोलिस आयुक्त वसंत परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विक्रांत देशमुख यांच्या नेतृत्वाखाली संबंधित वाहतूक विभागांचे अधिकारी व अंमलदार यांनी मोहिमेत सहभाग घेतला. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी तडजोड करणाऱ्या वाहनचालकांवर यापुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा वाहतूक पोलिसांनी दिला आहे.





















Join Our Whatsapp Group