पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाने शहरातील अनधिकृत जाहिरात फलकांविरोधात सुरू केलेल्या मोहिमेअंतर्गत ताथवडे परिसरातील एका मोठ्या जाहिरात होर्डिंगवर कारवाई केली आहे. शहराचे सौंदर्य जपणे आणि महापालिकेच्या महसुलात वाढ करणे या उद्देशाने ही कारवाई करण्यात आली.

महापालिकेच्या माहितीनुसार, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील नियम २४४ व २४५ तसेच महाराष्ट्र शासनाच्या जाहिरात नियमन व नियंत्रण अधिनियम (९ मे २०२२) अंतर्गत खाजगी जागेत जाहिरात फलक उभारण्यासाठी महापालिकेची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे. मात्र, अनेक ठिकाणी परवानगीशिवाय असे होर्डिंग उभारले जात असल्याने शहराचे विद्रूपीकरण होत असून महापालिकेच्या उत्पन्नालाही फटका बसत आहे.

याच पार्श्वभूमीवर आकाशचिन्ह व परवाना विभागाकडून शहरातील अनधिकृत होर्डिंगची पाहणी व निष्कासन मोहीम सुरू आहे. या मोहिमेदरम्यान जीवननगर, मेरीगोल्ड हॉस्पिटलजवळ, ताथवडे येथे मे. अद्विक ॲडव्हर्टायझिंग यांनी सुमारे ४० बाय ३० फूट आकाराचे होर्डिंग अनधिकृतपणे उभारल्याचे निदर्शनास आले.
उपआयुक्त (परवाना) राजेश आगळे यांच्या मार्गदर्शनाखाली परवाना निरीक्षक विनोद सरकानिया यांनी मंगळवारी (दि.२१ जुलै) संबंधित होर्डिंगवर कारवाई करून तो लोखंडी संरचनेसह निष्कासित केला.
महापालिकेने शहरातील सर्व जाहिरात एजन्सींना इशारा देत म्हटले आहे की, यापुढे परवानगीशिवाय उभारण्यात येणारे जाहिरात फलक आढळल्यास त्यांच्यावर तत्काळ कारवाई करून ते हटविण्यात येतील. तसेच सर्व जाहिरातदारांनी नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.





















Join Our Whatsapp Group