लाखो नागरिकांच्या आरोग्याशी खेळू नका; प्रशासनाला इशारा
पिंपरी (Pclive7.com):- मोशी कचरा डेपो दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पुनावळे येथे कचरा डेपो उभारण्याच्या मागणीवरून राजकीय वातावरण तापले असून, या विषयावर नगरसेवक विनोद नढे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. पुनावळे येथे कचरा डेपो उभारणे म्हणजे लाखो नागरिकांच्या आरोग्याशी आणि पर्यावरणाशी खेळण्यासारखे ठरेल, असा इशारा त्यांनी दिला.

विनोद नढे यांनी म्हटले आहे की, मोशीतील दुर्घटनेचे कारण पुनावळेचा कचरा डेपो रद्द होणे नसून, मोशी डेपोतील कचरा व्यवस्थापनातील त्रुटी, बायोमायनिंग प्रक्रियेतील विलंब आणि सुरक्षा उपाययोजनांतील कमतरता हे आहे. त्यामुळे मोशी दुर्घटनेचे खापर पुनावळ्यावर फोडणे चुकीचे असून, त्यातून दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला.

पुनावळे, ताथवडे, वाकड आणि हिंजवडी परिसरात आज मोठ्या प्रमाणावर लोकवस्ती असून, अशा भागात कचरा डेपो उभारल्यास दुर्गंधी, वायू प्रदूषण आणि आरोग्यविषयक गंभीर समस्या निर्माण होतील, असे नढे यांनी सांगितले. तसेच या परिसरातून वाहणारे पावसाचे पाणी पवना नदीत मिसळत असल्याने भविष्यात पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेवरही विपरीत परिणाम होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
मोठे डंपिंग यार्ड उभारण्यापेक्षा आधुनिक आणि विकेंद्रित कचरा व्यवस्थापनाची गरज असल्याचे सांगत, कचऱ्यावर स्थानिक पातळीवर प्रक्रिया, बायोमायनिंगला गती आणि वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पांवर भर देणे हा अधिक प्रभावी आण शाश्वत पर्याय असल्याचे त्यांनी नमूद केले.

मोशी दुर्घटनेची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी, तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कचरा व्यवस्थापनात आवश्यक सुधारणा कराव्यात, अशी मागणी करताना पुनावळेच्या नागरिकांवर पुन्हा कचरा डेपो लादण्याचा कोणताही प्रयत्न स्वीकारला जाणार नाही, अशी ठाम भूमिका विनोद नढे यांनी मांडली आहे.






















Join Our Whatsapp Group