पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १६ मधील विकासनगर, किवळे येथील सर्व्हे क्रमांक ३९, K Town शेजारील आरक्षित मोकळ्या जागेत सार्वजनिक उद्यान विकसित करण्यात यावे, अशी मागणी शिवसेना नगरसेविका ऐश्वर्या राजेंद्र तरस यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, विकासनगर परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरिक वास्तव्यास असून परिसरातील आरक्षित जागा सध्या रिकामी आहे. या भागात लहान मुलांसाठी खेळण्यासाठी तसेच ज्येष्ठ नागरिकांना सकाळ-संध्याकाळ फिरण्यासाठी, व्यायाम करण्यासाठी आणि विरंगुळ्यासाठी कोणतेही सार्वजनिक उद्यान उपलब्ध नाही. त्यामुळे नागरिकांकडून या ठिकाणी उद्यान विकसित करण्याची मागणी सातत्याने होत आहे.

परिसरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने तसेच पर्यावरण संवर्धनासाठी या जागेवर सुसज्ज सार्वजनिक उद्यान उभारणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यामध्ये मुलांसाठी आधुनिक खेळणी व खेळ साहित्य, ज्येष्ठ नागरिकांसाठी वॉकिंग ट्रॅक व बसण्याची व्यवस्था, पुरेशा प्रमाणात वृक्षारोपण व हिरवळ, आकर्षक सौंदर्यीकरण, एलईडी प्रकाश व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सुविधा, स्वच्छतागृहे, सुरक्षा रक्षक व सीसीटीव्ही व्यवस्था तसेच नियमित देखभाल यांचा समावेश करण्याची मागणी करण्यात आली आहे.

महापालिकेने संबंधित जागेची तातडीने पाहणी करून आवश्यक प्रशासकीय व आर्थिक मंजुरी देत सार्वजनिक उद्यान विकसित करण्याची कार्यवाही करावी, अशी विनंती नगरसेविका ऐश्वर्या तरस यांनी आयुक्तांकडे केली आहे. नागरिकांमध्येही या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळत असून परिसरात दर्जेदार उद्यान उभारले जावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.





















Join Our Whatsapp Group