वाकड (Pclive7.com):- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त समाजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली वाकड वाहतूक विभागातील पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी, महिला पोलीस कर्मचारी आणि वाहतूक वॉर्डन यांना रेनकोटचे वाटप करण्यात आले.

नगरसेविका सौ. स्नेहा रणजित कलाटे यांच्या हस्ते हा सेवाभावी उपक्रम पार पडला. पावसाळ्यात वाहतूक नियमन आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कार्यरत असलेल्या वाहतूक पोलिसांच्या सेवेला सलाम म्हणून हा उपक्रम आयोजित करण्यात आला.
यावेळी बोलताना नगरसेविका स्नेहा कलाटे म्हणाल्या, “मुसळधार पाऊस, कडक ऊन किंवा कोणतीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी वाहतूक पोलीस आणि वाहतूक वॉर्डन नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी व वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी अहोरात्र कर्तव्य बजावत असतात. त्यांच्या निःस्वार्थ सेवेला मानाचा मुजरा म्हणून हा छोटासा प्रयत्न करण्यात आला आहे.”

कार्यक्रमाला वाकड वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापू ढेरे, ठाणे अंमलदार, वाहतूक विभागातील अधिकारी, पोलीस कर्मचारी, महिला पोलीस कर्मचारी तसेच वाहतूक वॉर्डन मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमाच्या माध्यमातून समाजाच्या सुरक्षिततेसाठी दिवस-रात्र कार्यरत असलेल्या वाहतूक पोलीस दलाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. उपस्थितांनी या उपक्रमाचे स्वागत करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेल्या सेवाभावी कार्याचे कौतुक केले.





















Join Our Whatsapp Group