पिंपरी (Pclive7.com):- रूपीनगर प्रभाग क्र.१२ येथे वाढती पाणी टंचाई पाहता त्या विभागात नविन पाण्याची टाकी उभारणे गरजेचे आहे. म्हणून नविन पाण्याची टाकी उभारण्यासाठी तातडीने निविदा प्रक्रिया राबवण्यात यावी, तसेच टाकी उभारण्याचे काम जलदगतीने पुर्ण करावे व निगडी से.क्र.२२ येथील पाणीटंचाईची समस्या सोडविण्यात यावी अन्यथा महापालिके विरोधात “हंडा मोर्चा” काढण्यात येईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार यांनी दिला आहे.
याबाबत आयुक्तांना दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, निगडी प्रभाग क्र.१३ मधील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर वसाहत या ठिकाणी शासनाकडून काही वर्षांपुर्वी JNNURM योजने अंतर्गत झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प राबविण्यात आला होता. तसेच त्या प्रकल्पांतर्गत पुनर्वसित घरे व तेथील लोकसंख्या विचारात घेऊन निगडी राहुलनगर येथे पाण्याची टाकी बांधण्यात आली होती. पाण्याच्या टाकीची क्षमता पाहता काही वर्षे पिण्याच्या पाण्याचे योग्य रितीने नियोजन झाल्यामुळे झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील घरांना पाणी मिळत होते. परंतू सन २०१७ च्या निवडणूकांनंतर महापालिकेच्या “फ”क्षेत्रिय कार्यालयाच्या पाणीपुरवठा विभागाकडून त्याच पाण्याच्या टाकीवरून रुपीनगर विभागाला पाण्याची जोडणी करण्यात आली. मुळात पिण्याच्या पाण्याचे योग्य रितीने नियोजन व्हावे, तसेच वाढती लोकसंख्या पाहता महापालिकेने रुपीनगर विभागासाठी स्वतंत्र पाण्याची टाकी उभारणे गरजेचे असताना देखील तसे झाले नाही. त्यामुळे पाण्याचा कमी पुरवठा होत असून पाणी पुरवठा अधिकाऱ्यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कृत्रिम पाणी टंचाई जाणवू लागली आहे.
रूपीनगर परिसरात आजमितीला मोठ्या प्रमाणात गृहनिर्माण सोसायट्या आहेत.भविष्यात या परिसराची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. सध्याच्या घडीला येथील नागरिकांना पिण्याचे पाणी पुरेसे मिळत नाही. या भागात पाण्याची टाकी नसल्याने ही परिस्थिती उद्भवत आहे. या सर्व बाबींची गंभीर दखल घेऊन महापालिका प्रशासनाने से.क्र.२२ येथे योग्य रितीने पाण्याचे नियोजन व रूपीनगर येथे स्वतंत्र पाण्याची टाकी उभारण्यासाठी कार्यवाही करणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने पाण्याची टाकी उभारण्यासाठी तातडीने निविदा प्रक्रिया राबवण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात यावेत, तसेच पाण्याची गंभीर समस्या लवकरात लवकर सोडविण्यात यावी, अशी मागणी दिपक खैरनार यांनी केली आहे.
…अन्यथा महापालिकेवर ‘हंडा मोर्चा’ काढणार; सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार यांचा इशारा





















Join Our Whatsapp Group