पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना अधिक सुरक्षित, स्थिर आणि अखंडित वीजपुरवठा मिळावा यासाठी आमदार अमित गोरखे यांच्या सक्रिय पाठपुराव्यामुळे महावितरणकडून विविध महत्त्वपूर्ण उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत. निगडी, प्राधिकरण, आकुर्डी, मोहननगर, काळभोरनगर, शाहूनगर, संभाजीनगर आदी भागांतील वीज वितरण व्यवस्था सक्षम करण्यासाठी फिडर मेंटेनन्स, नवीन GOD बसविणे, फिडर पिलर बदलणे, LT केबल टाकणे आणि पर्यायी वीजपुरवठ्याची सुविधा निर्माण करण्याची कामे पूर्ण करण्यात आली आहेत.

महावितरण अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत आमदार गोरखे यांनी नागरिकांच्या वीजविषयक समस्या मांडून तातडीच्या उपाययोजनांच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार निगडी शाखेअंतर्गत २२ केव्ही प्रकाशगड फिडरचे संपूर्ण मेंटेनन्स करण्यात आले असून दोन नवीन GOD बसविण्यात आले आहेत. तसेच ३० डीटीसी यार्डमधील झाडांची छाटणी व साफसफाईची कामे पूर्ण झाली आहेत.
प्राधिकरण शाखेत २२ केव्ही टेल्को, डी-३ आणि रसटन फिडरचे मेंटेनन्स करण्यात आले आहे. चार ठिकाणी GOD चे मेंटेनन्स, तीन नवीन GOD बसविणे, दहा खराब फिडर पिलर बदलणे, १३ ठिकाणी बॉक्स मेंटेनन्स आणि १४ डीटीसी यार्डची साफसफाई अशी विविध कामे पूर्ण झाली आहेत. गुरुदत्त मंदिर, होंडा शोरूम आणि गोदावरी शाळा परिसरात जुन्या केबल बदलून नवीन LT केबल टाकण्यात आल्या आहेत. यामुळे संबंधित भागातील वीजपुरवठा अधिक सुरक्षित आणि स्थिर होण्यास मदत होणार आहे.

तसेच २२ केव्ही डी-३ फिडरमध्ये बिघाड झाल्यास २२ केव्ही टेल्को फिडरवरून पर्यायी वीजपुरवठा देता यावा यासाठी ७० मीटर नवीन केबल टाकण्यात आली आहे. त्यामुळे भविष्यातील तांत्रिक अडचणींच्या काळात नागरिकांना दीर्घकाळ वीज खंडित होण्याचा त्रास कमी होणार आहे.
महावितरण कर्मचाऱ्यांना आवश्यक साधनसामग्री, एचटी व एलटी केबल उपलब्ध करून देण्यात आल्या असून अतिरिक्त मेंटेनन्स एजन्सींचीही नियुक्ती करण्यात आली आहे. निगडी शाखेसाठी स्वतंत्र शिडी गाडी उपलब्ध करून देण्यास मंजुरी मिळाली असून ती लवकरच कार्यान्वित होणार आहे.
नागरिकांच्या तक्रारींचे जलद निवारण व्हावे यासाठी संबंधित महावितरण अधिकाऱ्यांचा स्वतंत्र व्हॉट्सॲप समन्वय गट तयार करण्याच्या सूचनाही आमदार गोरखे यांनी दिल्या आहेत. यामुळे तक्रारींवर तातडीने कार्यवाही करणे शक्य होणार आहे.
याबाबत बोलताना आमदार अमित गोरखे म्हणाले, “नागरिकांना अखंडित, सुरक्षित आणि दर्जेदार वीजपुरवठा मिळणे ही मूलभूत गरज आहे. केवळ तात्पुरत्या दुरुस्तीपेक्षा भविष्यातील गरजा लक्षात घेऊन कायमस्वरूपी सक्षम वीज व्यवस्था उभारण्यावर आमचा भर आहे. पिंपरी विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक भागातील वीजविषयक समस्या सोडविण्यासाठी महावितरण प्रशासनासोबत समन्वयाने सातत्याने काम सुरू आहे.”
आमदार अमित गोरखे यांच्या पुढाकारातून राबविण्यात आलेल्या या उपाययोजनांमुळे पिंपरी विधानसभा मतदारसंघातील वीज वितरण व्यवस्था अधिक सक्षम, सुरक्षित आणि विश्वासार्ह होण्यास मदत होणार असून तांत्रिक बिघाडांमुळे होणाऱ्या अडचणींमध्ये मोठी घट होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.





















Join Our Whatsapp Group