पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहराची वाढती लोकसंख्या, औद्योगिक विस्तार आणि भविष्यातील नागरी गरजा लक्षात घेऊन शहरातील वाहतूक व्यवस्था, सार्वजनिक सुविधा आणि नागरी व्यवस्थापन अधिक सक्षम, आधुनिक व नागरिकाभिमुख करण्यासाठी महापालिका कटिबद्ध आहे. शहराच्या दीर्घकालीन विकासाचे नियोजन करताना लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यातील समन्वय अधिक मजबूत करून प्रत्येक महत्त्वपूर्ण प्रकल्पाला गती देण्यात यावी. तसेच नगरसदस्यांनी मांडलेल्या सूचनांचा गांभीर्याने विचार करून त्यानुसार योजनांमध्ये आवश्यक सुधारणा व प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात यावी, असे स्पष्ट निर्देश महापौर रवि लांडगे यांनी दिले.

ऑगस्ट मधील महापालिका सभेमध्ये सुचविल्याप्रमाणे आज महानगरपालिकेच्या विविध महत्त्वपूर्ण प्रकल्प व धोरणांचे सविस्तर सादरीकरण करण्यात आले. यामध्ये महामेट्रो फेज-२ अंतर्गत निगडी ते चाकण मार्गिका, ईआरटीएस (ERTS) बस सेवा, वाहन पार्किंग धोरण आणि सार्वजनिक शौचालय धोरण या शहराच्या भविष्यातील विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण विषयांचा समावेश होता.
आज झालेल्या विविध सादरणीकरणास उपमहापौर शर्मिला बाबर, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्यासह विधी समिती सभापती सुजाता बोराटे, शहर सुधारणा समिती सभापती संजय काटे, महिला व बालकल्याण समिती सभापती राणीमाई पठारे, शिक्षण समिती सभापती, रवीना अंगोळकर, क्रीडा,कला,सांस्कृतिक समिती सभापती कैलास कुटे, प्रभाग अध्यक्ष मंदार देशपांडे, तृप्ती कांबळे, आरती चौंधे, अर्चना सस्ते, अर्चना करांडे, शिवानी नरळे, सविता खुळे, नगरसदस्य योगेश बहल, विठ्ठल काटे, सागर गवळी, सुलभा उबाळे, श्रुती वाकडकर, शाम जगताप, जालिंदर शिंदे, राजश्री लांडगे, योगेश लांडगे, विराज लांडे, नितीन लांडगे, डाॅ.सुहास कांबळे, वैशाली घोडेकर, सारिका मासुळकर, सोनम मोरे, नितीन काळजे, सचिन तापकीर, श्रुती डोळस, कृष्णा सुरकुले, शैलजा मोरे, अमित गावडे, धर्मपाल तंतरपाळे, निलेश तरस, आशा सूर्यवंशी, पल्लवी वाल्हेकर, विकास साने, यश साने, शेखर चिंचवडे, अनंत कोऱ्हाळे, अनुराधा गोरखे, सुप्रिया चांदगुडे, रिटा सानप, योगिता नागरगोजे, निलेश नेवाळे, पंकज भालेकर, अरुणा लंगोटे, वर्षा जगताप, संदीप वाघेरे, प्रियंका कुदळे, शालिनी गुजर, माया बारणे, शितल वर्णेकर, अनिल घोलप, रेश्मा भुजबळ, स्नेहा कलाटे, संदीप कस्पटे, बाबासाहेब त्रिभुवन, अर्चना तापकीर, अनिता काटे, कुंदा भिसे, शकुंतला धराडे, शशिकांत कदम, निता पाडाळे, कोमळ काळे तसेच शहर अभियंता मनोज सेठीया, मुख्य उद्यान अधिक्षक महेश गारगोटे, सह शहर अभियंता बापू गायकवाड, उप आयुक्त अण्णा बोदडे, डाॅ.प्रदीप ठेंगल, यासह महापालिकेच्या संबंधित विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

निगडी-चाकण महामेट्रो मार्गिकेला गती द्या..
पिंपरी-चिंचवड शहरातील सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम करण्यासाठी प्रस्तावित महामेट्रो फेज-२ अंतर्गत निगडी ते चाकण मार्गिकेचे सविस्तर सादरीकरण करण्यात आले. पिंपरी-चिंचवडमधील निवासी व व्यावसायिक भागांना चाकण औद्योगिक पट्ट्याशी अधिक प्रभावीपणे जोडण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
या मार्गिकेमुळे नागरिकांचा प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि सुविधाजनक होण्यास मदत होणार असून रस्त्यांवरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासही हातभार लागणार आहे. प्रस्तावित मार्गिका, स्थानके आणि शहराच्या विविध भागांना मिळणारी कनेक्टिव्हिटी यासंदर्भात नगरसदस्यांनी महत्त्वपूर्ण सूचना मांडल्या.
“मेट्रो हा केवळ वाहतुकीचा प्रकल्प नसून शहराच्या पुढील अनेक दशकांच्या विकासाची दिशा ठरविणारा प्रकल्प आहे. त्यामुळे शहरातील नागरिक, औद्योगिक क्षेत्र आणि भविष्यातील विस्तार यांचा विचार करून प्रत्येक निर्णय घेतला पाहिजे,” असे महापौर रवि लांडगे यांनी सांगितले. नगरसदस्यांनी मांडलेल्या व्यवहार्य सूचनांचा पुढील नियोजनात समावेश करून आवश्यक कार्यवाहीला गती देण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित यंत्रणेला दिले.
ईआरटीएस बस सेवेत नागरिकांच्या दैनंदिन प्रवासाला प्राधान्य
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात ईआरटीएस (ERTS) बस सेवा सुरू करण्याच्या प्रस्तावाबाबतही सविस्तर सादरीकरण करण्यात आले. नागरिकांना जलद, सुलभ व कार्यक्षम सार्वजनिक वाहतूक उपलब्ध करून देणे, प्रमुख मार्गांवरील वाहतुकीचा ताण कमी करणे आणि खासगी वाहनांवरील अवलंबित्व कमी करून सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढविणे या दृष्टीने या सेवेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील हा प्रकल्प लवकर पूर्ण करण्याच्या सूचना केल्या आहेत असे स्पष्ट केले. बससेवेचे प्रस्तावित मार्ग, प्रवाशांना उपलब्ध होणाऱ्या सुविधा, विविध भागांमधील कनेक्टिव्हिटी आणि अंमलबजावणीची प्रक्रिया यावर चर्चा करण्यात आली.
ईआरटीएसचे मार्ग निश्चित करताना केवळ तांत्रिक बाबींचा विचार न करता नागरिकांचा दैनंदिन प्रवास, औद्योगिक क्षेत्रातील कामगार, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच शहरातील प्रमुख वाहतूक केंद्रांची गरज लक्षात घेऊन नियोजन करावे, अशा सूचना महापौर रवि लांडगे यांनी दिल्या.
पार्किंग धोरण नागरिकांसाठी सुलभ असावे
शहरातील वाढत्या वाहनसंख्येमुळे निर्माण होणाऱ्या पार्किंग समस्येवर दीर्घकालीन आणि शिस्तबद्ध उपाययोजना करण्यासाठी प्रस्तावित वाहन पार्किंग धोरणाचेही सादरीकरण करण्यात आले.
प्रमुख बाजारपेठा, व्यापारी क्षेत्रे, गर्दीची ठिकाणे आणि सार्वजनिक परिसरातील पार्किंगचे नियोजन करताना उपलब्ध जागेचा अधिकाधिक परिणामकारक वापर करण्यासोबतच वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश महापौरांनी दिले.
पार्किंग धोरण हे नागरिकांना त्रास देणारे नव्हे, तर त्यांची समस्या सोडविणारे असले पाहिजे, अशी भूमिका महापौर रवि लांडगे यांनी मांडली. धोरणाच्या अंमलबजावणीपूर्वी स्थानिक परिस्थिती, नागरिकांच्या गरजा आणि नगरसदस्यांच्या सूचनांचा योग्य विचार करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
सार्वजनिक शौचालयांच्या स्वच्छता व देखभालीवर विशेष भर शहरातील सार्वजनिक स्वच्छता अधिक सक्षम करण्यासाठी सार्वजनिक शौचालय धोरणाबाबतही बैठकीत सादरीकरण करण्यात आले. सार्वजनिक शौचालयांची उपलब्धता, स्वच्छता, नियमित देखभाल-दुरुस्ती, सुरक्षितता आणि नागरिकांसाठी आवश्यक सुविधा यांचा सर्वसमावेशक विचार करण्यावर यावेळी भर देण्यात आला.
“केवळ सार्वजनिक शौचालयांची उभारणी करून महापालिकेची जबाबदारी संपत नाही. ते नियमितपणे स्वच्छ, सुरक्षित आणि वापरण्यायोग्य राहिले पाहिजेत. नागरिकांना दर्जेदार सार्वजनिक सुविधा देणे ही महापालिकेची मूलभूत जबाबदारी आहे,” असे महापौर रवि लांडगे यांनी स्पष्ट केले.
नगरसदस्यांच्या सूचनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करा
सादरीकरणादरम्यान उपस्थित नगरसदस्यांनी शहराच्या विविध भागांतील स्थानिक परिस्थिती, नागरिकांच्या अपेक्षा आणि संबंधित प्रकल्पांच्या अनुषंगाने विविध महत्त्वपूर्ण सूचना मांडल्या. या सूचना केवळ नोंदवून न ठेवता त्यांची व्यवहार्यता तपासून संबंधित योजना व धोरणांमध्ये आवश्यकतेनुसार समावेश करण्याचे निर्देश महापौर रवि लांडगे यांनी प्रशासनाला दिले.
प्रत्येक संबंधित विभागाने नगरसदस्यांच्या सूचनांवर केलेल्या कार्यवाहीचा स्वतंत्र आढावा घ्यावा, आवश्यक बदल प्रत्यक्ष अंमलात आणावेत आणि त्याबाबतचा प्रगती अहवाल कालबद्ध पद्धतीने सादर करावा, असेही महापौरांनी स्पष्ट केले.
‘आजचे नियोजन उद्याच्या पिंपरी-चिंचवडसाठी’
पिंपरी-चिंचवड हे वेगाने विकसित होणारे औद्योगिक आणि निवासी शहर असून आगामी काळातील लोकसंख्या व नागरी विस्तार लक्षात घेऊन आजपासूनच सक्षम पायाभूत सुविधांची उभारणी करणे आवश्यक असल्याचे महापौर रवि लांडगे यांनी सांगितले.
“आपल्याला केवळ आजच्या समस्यांवर उपाय शोधायचा नाही, तर पुढील २० ते २५ वर्षांतील पिंपरी-चिंचवड शहर कसे असेल याचा विचार करून नियोजन करायचे आहे. शहराचा विकास करताना नागरिक हा प्रत्येक निर्णयाचा केंद्रबिंदू असला पाहिजे. लोकप्रतिनिधींच्या सूचना, प्रशासनाचे तांत्रिक नियोजन आणि नागरिकांच्या प्रत्यक्ष गरजा यांचा समन्वय साधून आधुनिक, गतिमान आणि सर्वसमावेशक पिंपरी-चिंचवड घडविण्यासाठी महापालिका कटिबद्ध आहे,” असे महापौर रवि लांडगे यांनी सांगितले.
शहरातील सार्वजनिक वाहतूक अधिक मजबूत करणे, मेट्रोसारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना गती देणे, पर्यायी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था विकसित करणे, पार्किंग व्यवस्थेत शिस्त आणणे तसेच स्वच्छ व सुरक्षित सार्वजनिक सुविधा उपलब्ध करून देणे या सर्व बाबींना प्राधान्य देत नागरिककेंद्री आणि भविष्यवेधी विकासाच्या दिशेने पिंपरी चिंचवड महानगरपालिका ठोस पावले उचलत असल्याचे यावेळी महापौरांनी स्पष्ट केले.




















Join Our Whatsapp Group