पिंपरी (Pclive7.com):- हजरत मोहम्मद पैगंबर जयंती अर्थात ईद-ए-मिलाद निमित्त पिंपरी-चिंचवड शहरात बुधवारी (२६ ऑगस्ट) मोठ्या मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. लतीफिया मशीद, मिलिंदनगर येथून दुपारी ३ वाजता सुरू होणारी मुख्य मिरवणूक डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पिंपरी येथील पीएमपीएमएल मैदानापर्यंत जाणार आहे. मिरवणुकीनंतर पीएमपीएमएल मैदानावर सभेचे आयोजन करण्यात येणार असल्याने मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेने शहरातील विविध मार्गांवर तात्पुरते वाहतूक बदल लागू केले आहेत.

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पिंपरी, निगडी, चिखली, भोसरी, कासारवाडी, काळेवाडी, वाकड आणि नेहरूनगर परिसरातील प्रमुख मार्गांवर प्रवेशबंदी करण्यात आली आहे. हे बदल प्रामुख्याने २६ ऑगस्ट रोजी दुपारी १२ ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत लागू राहणार आहेत. अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळता इतर वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
पिंपरी विभागात महावीर चौकातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाकडे जाणाऱ्या वाहनांना साईनिस रोडऐवजी डी-मार्ट ग्रेड सेपरेटरमार्गे पुढे जाता येईल. नाशिक फाट्याकडून येणाऱ्या वाहनांसाठी डेअरी फार्म ग्रेड सेपरेटर तसेच एचपीपी खराळवाडी ग्रेड सेपरेटरचा पर्याय देण्यात आला आहे. इंदिरा गांधी पुलावरून आंबेडकर चौकाकडे जाणारी वाहतूक मोरवाडी चौकमार्गे वळवण्यात येणार आहे. नेहरूनगर चौकाकडून येणाऱ्या वाहनांना एचए कॉर्नर बसस्थानकातून मासुळकर कॉलनीमार्गे जाण्याचा पर्यायी मार्ग देण्यात आला आहे.

निगडी परिसरात भक्ती-शक्ती चौक, अंकुश चौक आणि टिळक चौक परिसरातही वाहतूक निर्बंध राहणार आहेत. भक्ती-शक्ती चौकाकडून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना संबंधित ग्रेड सेपरेटरमार्गे पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे. आकुर्डी, थर्मॅक्स चौक आणि खंडोबामाळ चौक परिसरातही वाहतूक वळवण्यात येणार आहे.
चिखली वाहतूक विभागाच्या हद्दीत कृष्णानगर चौक, जाधव सरकार चौक, चिखली गाव चौक, पिंगळे चौक, लक्ष्मी चौक आणि केएसबी चौक परिसरातही सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत विविध मार्गांवर प्रवेशबंदी राहणार आहे. वाहनचालकांनी पोलिसांनी सुचवलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करावा.
मिरवणूक ज्या मार्गावरून पुढे जाईल, त्यानुसार टप्प्याटप्प्याने वाहतूक बंद किंवा वळवण्यात येणार असल्याचे वाहतूक पोलिसांनी स्पष्ट केले आहे. नागरिकांनी अनावश्यक गर्दी टाळावी, प्रवासाचे नियोजन आधीच करावे आणि पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.




















Join Our Whatsapp Group