पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहरातील खासगी शाळांकडून आकारल्या जाणाऱ्या भरमसाठ शुल्कवाढीच्या विरोधात महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या सदस्या तथा नगरसेविका रिटा सचिन सानप यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. खासगी शाळांच्या शुल्कवाढीवर नियंत्रण आणण्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (SOP) मध्ये कडक आणि लोकहिताच्या तरतुदींचा समावेश करण्याची मागणी त्यांनी शिक्षण विभागाकडे केली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणावर कामगार, मध्यमवर्गीय आणि सर्वसामान्य कुटुंबे वास्तव्यास असून खासगी शाळांकडून दरवर्षी होणारी अनियंत्रित शुल्कवाढ पालकांसाठी आर्थिक ओझे ठरत आहे. या पार्श्वभूमीवर रिटा सानप यांनी पालकांच्या हितासाठी अनेक महत्त्वपूर्ण मागण्या पुढे केल्या आहेत. त्यांनी केलेल्या मागण्यांमध्ये खासगी शाळांच्या शुल्कवाढीवर स्पष्ट नियमांद्वारे नियंत्रण ठेवणे, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील (EWS) विद्यार्थ्यांसाठी किमान २० टक्के जागा राखीव ठेवणे आणि प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी लॉटरी पद्धतीने प्रवेश देणे यांचा समावेश आहे. यामुळे पालकांवरील आर्थिक ताण कमी होण्यासोबतच शिक्षण क्षेत्रात समान संधी उपलब्ध होण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

यासोबतच विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना जड दप्तरांचे ओझे वाहावे लागत असल्याने त्यांच्या शारीरिक आरोग्यावर परिणाम होत आहे. त्यामुळे शासनाच्या धोरणानुसार सर्व शाळांमध्ये ‘दप्तर विरहित दिवस’ प्रभावीपणे राबविण्याची मागणी त्यांनी केली आहे.
या उपक्रमांतर्गत सुतारकाम, बागकाम, मातीची भांडी तयार करणे, हस्तकला, स्थानिक व्यवसायांची ओळख, कला-क्रीडा उपक्रम, प्रश्नमंजुषा, पुस्तक वाचन, कथाकथन, लोकसंस्कृतीची माहिती, परिसर अभ्यास, क्षेत्रभेटी आणि पर्यावरण संवर्धनाचे प्रत्यक्ष धडे यांचा समावेश करण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला आहे.
दरम्यान, आमदार महेशदादा लांडगे यांच्या संकल्पनेनुसार पिंपरी-चिंचवडला आदर्श शैक्षणिक केंद्र म्हणून विकसित करण्याच्या दृष्टीने हे महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे. शिक्षण क्षेत्रातील व्यावसायिकतेला आळा घालून सर्व विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आणि न्याय्य शिक्षण मिळावे, यासाठी रिटा सानप यांनी घेतलेल्या भूमिकेचे शहरातील पालक आणि नागरिकांकडून स्वागत केले जात आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणाऱ्या रिटा सानप यांच्या या पुढाकारामुळे खासगी शाळांच्या शुल्कवाढीच्या प्रश्नावर प्रभावी तोडगा निघण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.




















Join Our Whatsapp Group