पिंपरी (Pclive7.com):- प्रभाग क्रमांक १३ मधील यमुनानगर, सेक्टर २२ आणि साईनाथ नगर परिसरातील नागरिकांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या NCMC (National Common Mobility Card) स्मार्ट कार्ड मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या मोहिमेद्वारे तब्बल ८९० नागरिकांनी स्मार्ट कार्डचा लाभ घेतला.

मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले आणि माजी नगरसेविका अश्विनी सचिन चिखले-मराठे यांच्या सौजन्याने ही मोहीम साईनाथ नगर येथील मनसे जनसंपर्क कार्यालयात सलग सहा ते सात दिवस राबविण्यात आली. एसटी महामंडळाच्या सहकार्याने ज्येष्ठ नागरिक, अमृत ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी अल्पदरात NCMC स्मार्ट कार्ड उपलब्ध करून देण्यात आले. नागरिकांना सुलभ सेवा मिळावी आणि विशेषतः ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय टाळावी या उद्देशाने मोहिमेचे नियोजन करण्यात आले होते. त्यामुळे मोठ्या संख्येने नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेतला.

मोहिमेला मिळालेल्या प्रतिसादामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, वाढती मागणी लक्षात घेता लवकरच पुन्हा अशी मोहीम आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली. या उपक्रमाचे विविध स्तरांतून स्वागत होत असून, नागरिकांना शासनाच्या सुविधांचा लाभ मिळवून देण्यासाठी मनसेच्या वतीने पुढील काळातही अशा जनहिताच्या उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सचिन चिखले यांनी सांगितले.




















Join Our Whatsapp Group