पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहरात दहीहंडी उत्सवाची जोरदार तयारी सुरू असून विविध भागांत भव्य दहीहंडी सोहळ्यांचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाच्या उत्सवात अनेक नामांकित अभिनेते, अभिनेत्री आणि खेळाडू उपस्थित राहणार असल्याने कार्यक्रमस्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी विशेष खबरदारी घेत संपूर्ण उत्सवावर करडी नजर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

दहीहंडी उत्सवाच्या नावाखाली काही ठिकाणी होणारे अश्लील किंवा आक्षेपार्ह नृत्यप्रकार रोखण्यासाठी पोलिस प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे. सेलिब्रिटींच्या उपस्थितीत रंगणाऱ्या कार्यक्रमांमध्ये अनेकदा अशोभनीय प्रकार घडत असल्याचे निदर्शनास आले असून, अशा घटनांमुळे सामाजिक वातावरण बिघडण्याची तसेच कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असते.
यामुळे दहीहंडी उत्सवादरम्यान कोणत्याही मंडळाने अश्लील डान्स, आक्षेपार्ह सादरीकरण किंवा सार्वजनिक शांततेला बाधा आणणारे प्रकार केल्यास संबंधित आयोजकांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दिला आहे.

उत्सव हा आनंद, सांस्कृतिक परंपरा आणि सामाजिक एकतेचा संदेश देणारा असावा, असे सांगत पोलिसांनी सर्व आयोजकांना नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे. तसेच कोणतीही तक्रार प्राप्त झाल्यास तात्काळ दखल घेऊन संबंधितांविरोधात कायदेशीर पावले उचलली जातील, असेही पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे. दहीहंडी उत्सव शांततापूर्ण, सुरक्षित आणि सांस्कृतिक मूल्यांचे जतन करणारा व्हावा, यासाठी पोलिसांकडून विशेष बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून संवेदनशील ठिकाणी अतिरिक्त पोलीस फौजाही नियुक्त केली जाणार आहे.




















Join Our Whatsapp Group