भोसरीत रंगणार गोविंदा पथकांचा थरार; संगीत, मनोरंजनासोबत सामाजिक बांधिलकीचा संदेश
भोसरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवडमधील पारंपरिक आणि प्रतिष्ठेच्या छावा प्रतिष्ठान आयोजित दहीहंडी उत्सव २०२६ ला यंदा प्रसिद्ध बॉलीवूड पार्श्वगायिका पलक मुछाल यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. आज शनिवार, दि. ५ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता पीसीएमटी चौक, भोसरी येथे या भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

छावा प्रतिष्ठानचे निमंत्रक तथा नगरसेवक जालिंदर (बाप्पू) शिंदे यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या उत्सवात शहरातील तसेच विविध भागांतील गोविंदा पथके सहभागी होणार असून, थरावर थर रचत दहीहंडी फोडण्याचा रोमांचक सोहळा नागरिकांना अनुभवता येणार आहे.
पलक मुछाल या आपल्या मधुर आणि भावस्पर्शी आवाजासाठी देशभरात प्रसिद्ध आहेत. आशिकी २ चित्रपटातील ‘चाहूँ मैं या ना’ आणि ‘मेरी आशिकी’, एम.एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी मधील ‘कौन तुझे’, प्रेम रतन धन पायो मधील शीर्षक गीत, किक मधील ‘जुम्मे की रात’, सनम रे मधील ‘हुआ है आज पहली बार’, गब्बर इज बॅक मधील ‘तेरी मेरी कहानी’ यांसह अनेक लोकप्रिय गाण्यांना त्यांनी आपला आवाज दिला आहे.
मात्र पलक मुछाल यांची खरी ओळख केवळ प्रसिद्ध पार्श्वगायिका म्हणून नसून, त्यांच्या मानवतावादी कार्यामुळेही आहे. ‘सेव्ह लिटल हार्ट्स’ या उपक्रमातून त्यांनी गरजू मुलांच्या हृदयावरील शस्त्रक्रियांसाठी आपल्या संगीताच्या माध्यमातून निधी उभारला आहे. 2025 मध्ये प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार त्यांच्या Palak Palash Charitable Foundation च्या माध्यमातून 3,947 मुलांच्या हृदयशस्त्रक्रियांना मदत झाल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यांच्या या कार्याची Guinness World Records च्या Hall of Fame द्वारे दखल घेण्यात आली असून, त्यांच्या नावाचा Limca Book of Records मध्येही उल्लेख आहे.

लहान वयापासूनच सामाजिक कार्याची सुरुवात केलेल्या पलक मुछाल यांनी आपल्या कॉन्सर्टच्या माध्यमातून मिळणाऱ्या मानधनाचा उपयोग गरजू मुलांच्या उपचारांसाठी करण्याचा संकल्प केला. त्यांच्या या कार्यामुळे संगीत क्षेत्रासोबतच सामाजिक क्षेत्रातही त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे.
“दहीहंडी हा केवळ उत्सव नसून आपल्या संस्कृती, एकजुटी आणि सामाजिक बांधिलकीचा उत्सव आहे. यंदा प्रसिद्ध गायिका पलक मुछाल यांच्या उपस्थितीमुळे उत्सवाची रंगत वाढणार असून, त्यांच्या प्रेरणादायी सामाजिक कार्याचा संदेशही नागरिकांपर्यंत पोहोचणार आहे. भोसरीकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उत्सवाचा आनंद घ्यावा,” असे आवाहन छावा प्रतिष्ठानचे निमंत्रक तथा नगरसेवक जालिंदर (बाप्पू) शिंदे यांनी केले.
“यंदा जल्लोष होणार, इतिहास घडणार!” या संकल्पनेतून होणाऱ्या या दहीहंडी उत्सवात नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.




















Join Our Whatsapp Group