पिंपरी (Pclive7.com):- दहीहंडी उत्सवानंतर लोखंडी सांगाडा (स्ट्रक्चर) उतरविताना झालेल्या भीषण अपघातात एका 45 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना जुन्या सांगवी परिसरात घडली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सलमा सलाउद्दीन पठाण (वय 45) या महिला दहीहंडी उत्सव संपल्यानंतर घटनास्थळी उपस्थित होत्या. रात्री सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास मंडळाचे कार्यकर्ते दहीहंडीसाठी उभारलेला लोखंडी सांगाडा काढत असताना त्याचा एक अवजड भाग अचानक निसटून खाली पडला. हा भाग थेट सलमा पठाण यांच्या डोक्यावर कोसळल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. मार इतका जबरदस्त होती की त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेतील सर्वाधिक वेदनादायी बाब म्हणजे मृत सलमा पठाण यांचा मुलगा संबंधित दहीहंडी मंडळात सक्रिय कार्यकर्ता म्हणून कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या अपघातामुळे संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरातही शोकमय वातावरण निर्माण झाले आहे.

मुलाचा मंडळाशी असलेला संबंध लक्षात घेऊन पठाण कुटुंबीयांनी या प्रकरणात कोणतीही पोलिस तक्रार दाखल करण्यास नकार दिल्याचे समजते. मात्र, घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी स्वतःहून या अपघाताची नोंद घेऊन पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यासाठी कुटुंबीयांना विनंती केली आहे.
दरम्यान, दहीहंडी आणि इतर सार्वजनिक उत्सवांमध्ये उभारण्यात येणाऱ्या लोखंडी संरचनांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून अशा दुर्घटना टाळण्यासाठी अधिक काळजी घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे. पोलिसांकडून घटनेचा अधिक तपास सुरू आहे.




















Join Our Whatsapp Group