
१८, २०, २४ आणि २५ ऑक्टोबर रोजी विविध भागांत आयोजन; शस्त्रपूजनासह शारीरिक व घोष प्रात्यक्षिके होणार
पिंपरी (Pclive7.com):- हिंदू समाज संघटन, राष्ट्रहित आणि सेवाकार्यासाठी कटिबद्ध असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे पिंपरी-चिंचवड शहरात यंदा ५० ठिकाणी विजयादशमी शस्त्रपूजन उत्सव, तर २७ ठिकाणी पथसंचलनांचे आयोजन करण्यात आले आहे. हे उत्सव १८, २०, २४ आणि २५ ऑक्टोबर रोजी शहरातील विविध भागांत होणार आहेत.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे दरवर्षी विजयादशमीनिमित्त शस्त्रपूजन उत्सवांचे आयोजन केले जाते. यंदा चिंचवड, पिंपरी, काळेवाडी-रहाटणी, पिंपळे निलख, पिंपळे सौदागर, रावेत, आकुर्डी, वाकड, हिंजवडी, ताथवडे, पुनावळे, थेरगाव, संत तुकारामनगर, सांगवी, पिंपळे गुरव, कासारवाडी, देहू, देहूरोड, चिखली, निगडी, संभाजीनगर, आळंदी, चऱ्होली, दिघी, मोशी, भोसरी आणि इंद्रायणीनगर या भागांत उत्सव होणार आहेत.

या उत्सवांमध्ये पारंपरिक शस्त्रपूजनासह विविध शारीरिक प्रात्यक्षिके, घोष प्रात्यक्षिके आणि गीतगायनाचे कार्यक्रम होणार आहेत. तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती लाभणार असून, संघाच्या प्रमुख कार्यकर्त्यांकडून उपस्थितांना मार्गदर्शन केले जाणार आहे.

शहरातील विविध भागांत होणाऱ्या या उत्सवांच्या माध्यमातून संघाचे कार्य, शिस्त आणि सेवाभावी उपक्रमांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.

या विजयादशमी शस्त्रपूजन उत्सवांमध्ये नागरिकांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पिंपरी-चिंचवड जिल्हा संघचालक विनोद बन्सल यांनी केले आहे.


















Join Our Whatsapp Group