पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहर कलाप्रेमी मंचाच्या वतीने चिंचवड येथील तारांगण सभागृहात ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आणि अभिनेत्री मधू कांबीकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कलाकार, साहित्यिक आणि पत्रकारांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. अध्यक्षस्थानी पद्मश्री गिरीश प्रभुणे होते.

यावेळी नाट्य परिषदेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, ज्येष्ठ कलावंत वसंत अवसरीकर, लेखक प्रभाकर ओव्हाळ, काँग्रेस शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, निहाल पानसरे, आणि साहित्य परिषदेचे अध्यक्ष राजन लाखे आदी उपस्थित होते.

गिरीश प्रभुणे यांनी मधू कांबीकर यांनी, कोल्हाटी समाजासाठी केलेल्या कार्याचे स्मरण केले. तर भाऊसाहेब भोईर यांनी कलाकार कधीच आपल्या आठवणींतून दूर जात नाही, असे सांगत त्यांच्या कलेचा वारसा कायम जिवंत राहत असल्याची भावना व्यक्त केली.

ज्येष्ठ कलावंत वसंत अवसरीकर यांनी, मधू कांबीकर यांच्यासोबत नाटक आणि चित्रपटांमध्ये काम करतानाचे अनुभव सांगत मधुताई आणि ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांच्या आठवणींना उजाळा दिला.

पत्रकार नंदकुमार सातुर्डेकर यांनी नाना पाटेकर यांच्या भेटीचा प्रसंग सांगितला. ते म्हणाले की, नाना पाटेकर हे एक वेगळेच रसायन असलेले अभिनेते होते. डॉ. श्रीराम लागू यांच्या प्रमाणे वेळोवेळी त्यांनी भूमिका घेतली. पु ल देशपांडे प्रकरणात शिवसेनाप्रमुखांना एक दिवस मागे वळून पाहाल तर एकटेच उरलेले असाल हा नानांनी घेतलेला चिमटा, देवेंद्र फडणवीस यांना भाषण छान करतोस मात्र ओरडून बोलू नकोस नाहीतर त्रास होईल तुला हा त्यांनी दिलेला सल्ला, एका वृत्तपत्राच्या कार्यक्रमात बोलताना राजकीय मंडळींची प्रॉपर्टी निवडून आल्यावर वर्षभरात वाढते कशी हा त्यांनी केलेला सवाल सामान्य माणसाच्या भावना व्यक्त करणारा होता. नानांनी धीर गंभीर बंडखोर विनोदी सगळ्या भूमिका जीव ओतून केल्या. असे सातुर्डेकर म्हणाले.

दादा आढाव यांनी मधू कांबीकर यांच्यासोबतच्या शालेय जीवनातील आठवणी सांगितल्या. अश्विनी सातव यांनी दोन्ही कलाकारांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन समाजात माणुसकी जपण्याचे आवाहन केले. सूत्रसंचालन पत्रकार गोविंद वाकडे यांनी केले, पत्रकार व लेखक विजय जगताप यांनी प्रास्ताविक केले. अविनाश कांबीकर यांनी श्रद्धांजली अर्पण करून सभेचा समारोप केला. या कार्यक्रमासाठी अनिल माने, प्रवीण तुपे, अनिस पठाण, विष्णू मांजरे, गणेश दिघे व नितीन भोगले यांनी पुढाकार घेतला.

मधू कांबीकर यांनी केलेल्या मदतीमुळेच वसतिगृहाची झाली उभारणी – पद्मश्री गिरीश प्रभुणे
कोल्हाटी समाजातील मुलींनी नाचगाणी सोडून शिक्षणाच्या प्रवाहात यावे, यासाठी मी उभारत असलेल्या वसतिगृहाला मधू कांबीकर यांनी केलेल्या २५ हजार रुपयांच्या मदतीमुळेच सामाजिक समरसतेचा प्रवास पुढे निर्धोकपणे पार पडला असे प्रभुणे यांनी यावेळी सांगितले.



















Join Our Whatsapp Group