गुरुजनांचा मानपत्र, पुणेरी पगडी, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव; जुन्या आठवणींना उजाळा
चिंचवड (Pclive7.com):- श्री. जैन विद्यालय, चिंचवड स्टेशन येथील इयत्ता दहावीच्या १९८५ च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा शुक्रवार, दि. २ ऑक्टोबर २०२६ रोजी चिंचवड येथील रेस्टॉरंट बर्ड व्हॅली येथे अत्यंत उत्साहपूर्ण, भावनिक व दिमाखदार वातावरणात संपन्न झाला. तब्बल चार दशकांनंतर गुरुजन आणि माजी विद्यार्थी एकत्र आल्याने संपूर्ण कार्यक्रमात जुन्या आठवणी, कृतज्ञता आणि स्नेहभाव यांचा सुंदर संगम पाहायला मिळाला.

कार्यक्रमाच्या दालनात गुरुजनांचे आगमन होताच उपस्थित माजी विद्यार्थ्यांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी करून उत्स्फूर्त स्वागत केले. यानंतर उपस्थित शिक्षकांना मानपत्र, पुणेरी पगडी, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. शाळेतील कार्यालयीन कर्मचारी आणि शिपाई यांनाही मोमेंटो देऊन गौरविण्यात आले.

या मेळाव्याला श्री. जैन विद्यालयाचे माजी विद्यार्थी तथा महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष मा. ना. श्री. अण्णा बनसोडे आणि महाराष्ट्र राज्य लेखा-जोखा समितीचे माजी अध्यक्ष (कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा) श्री. सचिन पटवर्धन यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या दोन्ही मान्यवरांचा सत्कार श्री. घनश्यामकांबळे सर व श्री. दिनेश नाकाडे सर यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी श्रीम. शैलजा पुसाळकर बाई, श्रीम. राधा परांडे बाई, श्रीम. माधवी गाडगीळ बाई, श्रीम. मधुबाला पटवा बाई, श्री. घनश्याम कांबळे सर, श्री. एकनाथ भडके सर, श्री.दिनेश नाकाडे सर, श्री. सोपान सावंत सर, श्री. गंगाधर शिरसाठ सर, श्री. काशिनाथ सदाफुले सर, श्री.अंकुश खामगळ सर आणि श्री. बाळासाहेब पाटील सर हे शिक्षक उपस्थित होते. तसेच कार्यालयीन कर्मचारी श्री. प्रेमसुख कटारिया, श्री.मदनलाल बागमार आणि शिपाई श्री.सुभाष मुनोत व श्री. चंद्रकांत गडकर यांचीही उपस्थिती होती.

शिक्षकांच्या मानपत्राचे भावपूर्ण वाचन..
शिक्षकांप्रती आदर व कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या मानपत्राचे वाचन श्री. ज्योत सोनवणे यांनी केले. शिक्षक प्रतिनिधी म्हणून श्री. घनश्याम कांबळे सर, श्री. दिनेश नाकाडे सर, श्री.बाळासाहेब पाटील सर आणि श्रीम. मधुबाला पटवा बाई यांनी आपले मनोगत व्यक्त केले. इतक्या सुंदर नियोजनबद्ध पद्धतीने आयोजित केलेला माजी विद्यार्थी मेळावा आपण पहिल्यांदाच अनुभवत असल्याची भावना शिक्षकांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केली. विद्यार्थ्यांनी चार दशकांनंतरही आपल्या गुरुजनांची आठवण ठेवून केलेल्या सन्मानाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

गुरुजनांमुळेच जीवनात यशस्वी झाल्याची विद्यार्थ्यांची भावना..
विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून शुभांगी गराडे आणि ज्योत सोनवणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शाळेत शिक्षकांनी दिलेले ज्ञान, संस्कार, शिस्त आणि मार्गदर्शन यांच्यामुळेच आज सर्व माजी विद्यार्थी आपापल्या क्षेत्रात यशस्वी होऊ शकल्याची कृतज्ञतापूर्ण भावना त्यांनी व्यक्त केली.

मा. ना. श्री. अण्णा बनसोडे आणि श्री. सचिन पटवर्धन यांनीही आपल्या मनोगतातून शाळेविषयीच्या आठवणी जागवल्या आणि शाळेने दिलेल्या संस्कारांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. या वेळी उपस्थितांमध्ये जुन्या आठवणींना उजाळा देत आनंदाचे आणि भावनिक क्षण अनुभवायला मिळाले.

नियोजनबद्ध आयोजनाने मेळावा ठरला अविस्मरणीय..
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन श्री. प्रशांत काटवटे यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. रामचंद्र पांचाळ यांनी केले.
या मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. मारुती बहिरवाडे, श्री. संजय दातीर पाटील, श्री. संपत पोटघन, श्री. प्रसाद भागवत, श्री. प्रविण भालेराव, श्री. कैलास गिराम, श्री. प्रशांत काटवटे, श्री. ज्योत सोनवणे, श्री. सुनील येळवंडे,श्री. धनंजय गाडे पाटील आणि श्रीमती सविता पाटणे यांनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमाच्या शेवटी सर्व माजी विद्यार्थ्यांना मोमेंटो देऊन गौरविण्यात आले. त्यानंतर स्नेहभोजनाचा आस्वाद घेत गुरुजन आणि माजी विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.
गुरुजनांप्रती कृतज्ञता, मित्रत्वाचे अतूट बंध आणि शालेय जीवनातील सुवर्णक्षण पुन्हा अनुभवण्याची संधी देणारा हा स्नेहमेळावा सर्वांसाठी अविस्मरणीय ठरला.



















Join Our Whatsapp Group