पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी मिलिटरी डेअरी फार्म आणि पिंपळे सौदागर परिसरातील पवना नदीवर पूर्वी अस्तित्वात असलेला बंधारा पुन्हा बांधण्यात यावा, अशी जोरदार मागणी सामाजिक कार्यकर्ते अमोल उबाळे यांनी केली आहे. यासंदर्भात महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना निवेदन देण्यात आले असून, काही वर्षांपूर्वी पाडण्यात आलेल्या या बंधाऱ्यामुळे परिसराची झालेली दयनीय अवस्था आणि पर्यावरणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

पत्रात म्हटले आहे की, काही वर्षांपूर्वी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने मच्छरांच्या उपद्रवाचे कारण पुढे करत, हा बंधारा पाडण्यासाठी डेअरी फार्म प्रशासनाला निधी उपलब्ध करून दिला होता. त्यानंतर हा बंधारा पाडण्यात आला. मात्र, तेव्हापासून नदीपात्रात पाणी साठणे बंद झाल्याने या महत्त्वपूर्ण जलस्रोताची अवस्था अत्यंत दयनीय व एका गटारासारखी झाली आहे.

हा बंधारा उभा असताना पिंपरीगाव, पिंपळे सौदागर, रहाटणी, काळेवाडी, थेरगाव आणि चिंचवड या संपूर्ण परिसरातील पवना नदी वर्षभर पाण्याने भरलेली असायची. डेअरी फार्ममधील गायी-म्हशींसह परिसरातील जनावरांना या पाण्याचा मोठा आधार होता. तसेच, भूजलाच्या उच्च पातळीमुळे आजूबाजूच्या गावातील विहिरी आणि बोअरवेलना वर्षभर पाणी असायचे. परंतु, बंधारा नष्ट केल्यापासून भूजल पातळी वेगाने खालावली असून नदीपात्रात केवळ दुर्गंधीयुक्त सांडपाणी वाहत असल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

सध्या काही स्वार्थी बांधकाम व्यावसायिक पूररेषा मर्यादित ठेवण्याच्या कारणावरून या बंधाऱ्याच्या पुनर्बाधणीला अप्रत्यक्ष विरोध करत आहेत. मोजक्या बिल्डरांच्या व्यावसायिक फायद्यासाठी आणि दबावामुळे या महत्त्वाच्या सार्वजनिक कामाकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप उबाळे यांनी केला आहे.

जनहित आणि पर्यावरण रक्षणाला प्राधान्य देऊन प्रशासनाने कोणत्याही दबावाखाली न येता, पिंपरी डेअरी फार्म व पिंपळे सौदागर येथील पाडलेल्या बंधाऱ्याची त्वरित पुनर्बाधणी करावी, अशी आग्रही मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.



















Join Our Whatsapp Group