पिंपरी (Pclive7.com):- दसरा आणि दिवाळी या सणांच्या पार्श्वभूमीवर मिठाई आणि दुग्धजन्य पदार्थांची मागणी वाढत असतानाच पुणे अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई केली आहे. कर्नाटकातून पुण्यात आणण्यात येणारा संशयास्पद खवा आणि पनीरचा साठा जप्त करण्यात आला आहे.

कसबा पेठ, बिबवेवाडी आणि बावधन परिसरात करण्यात आलेल्या या कारवाईत तीन ते चार वाहने ताब्यात घेण्यात आली असून, सुमारे ३५ लाख रुपये किमतीचा अंदाजे १० टन खवा आणि पनीर जप्त करण्यात आल्याची माहिती आहे.

जप्त करण्यात आलेल्या खवा आणि पनीरच्या साठ्यावर उत्पादनाची तारीख, संबंधित तपशील तसेच अन्नसुरक्षेच्या निकषांबाबत आवश्यक माहिती छापलेली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या पदार्थांच्या गुणवत्तेबाबत आणि सुरक्षिततेबाबत संशय व्यक्त केला जात आहे.

प्रयोगशाळेतील तपासणीनंतर सत्य समोर येणार
जप्त करण्यात आलेला साठा मानवी आरोग्यासाठी घातक असण्याची शक्यता लक्षात घेऊन त्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहेत. या तपासणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित पदार्थांच्या गुणवत्तेबाबत आणि त्यातील संभाव्य भेसळीबाबत स्पष्टता येणार आहे.

दरम्यान, दसरा आणि दिवाळीच्या काळात मिठाई, खवा आणि पनीर यांसारख्या पदार्थांची मोठ्या प्रमाणात विक्री होते. अशा परिस्थितीत संशयास्पद दुग्धजन्य पदार्थ बाजारात विक्रीसाठी येत असल्यास नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाने अशा पदार्थांच्या विक्रीवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे.

नागरिकांनीही सणासुदीच्या काळात मिठाई आणि दुग्धजन्य पदार्थ खरेदी करताना विश्वासार्ह विक्रेत्यांकडूनच खरेदी करावी तसेच पदार्थांची गुणवत्ता आणि स्वच्छतेकडे लक्ष द्यावे, असे आवाहन करण्यात येत आहे.



















Join Our Whatsapp Group