विजेत्या संघाला २५ हजारांचे पारितोषिक; गुणवंत खेळाडूंना ‘पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग’मध्ये खेळण्याची संधी
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहरातील क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी पिंपरी चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशनच्या वतीने ‘पिंपरी चिंचवड करंडक’ आंतरक्लब खुल्या गटाच्या टी-२० क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार, दि. २१ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत हिंजवडी येथील फोर स्टार क्रिकेट मैदानावर ही स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेत शहरातील विविध क्रिकेट क्लब आणि अकॅडमींचे १६ संघ विजेतेपदासाठी आमनेसामने येणार असून, एकूण ५० हजार रुपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत.

संघटनेचे अध्यक्ष जगदीश शेट्टी आणि स्पर्धेचे संयोजक सुशील जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड शहरातील क्रिकेटचा विकास व्हावा आणि स्थानिक खेळाडूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला असून, बाद फेरीच्या पद्धतीने सामने खेळविण्यात येणार आहेत.

१६ संघांमध्ये विजेतेपदासाठी चुरस
या स्पर्धेत २ नाईन स्पोर्ट्स, एचएस पँथर्स, सह्याद्री किंग्ज, व्हीडीआर क्रिकेट अकॅडमी, यशवी क्रिकेट अकॅडमी, अव्दिका स्पोर्ट्स, शिवाजीयन्स क्रिकेट क्लब, विन टेंपल क्लब, बजरंग दल, पीसीएमसी फायर डिपार्टमेंट, क्रिक पँथर, एसजेएसएफ यंगस्टर्स, लक्ष्य क्रिकेट अकॅडमी, प्राधिकरण जिमखाना, मावळ वॉरियर्स आणि यजमान पिंपरी चिंचवड क्रिकेट अकॅडमी या १६ संघांचा समावेश आहे.

विजेत्यांना रोख पारितोषिकांसह करंडक
स्पर्धेतील विजेत्या संघाला २५ हजार रुपये आणि करंडक, उपविजेत्या संघाला १५ हजार रुपये आणि करंडक, तर तृतीय क्रमांकाच्या संघाला पाच हजार रुपये आणि करंडक देऊन गौरविण्यात येणार आहे. याशिवाय उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना वैयक्तिक पारितोषिके प्रदान केली जाणार आहेत. यामध्ये स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू, सर्वोत्कृष्ट फलंदाज, सर्वोत्कृष्ट गोलंदाज, सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू, सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक, सर्वोत्कृष्ट यष्टिरक्षक आणि सर्वोत्कृष्ट उदयोन्मुख खेळाडू या पुरस्कारांचा समावेश आहे. तसेच प्रत्येक सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूलाही गौरविण्यात येणार आहे.

‘पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग’मध्ये खेळण्याची संधी
या स्पर्धेचे विशेष महत्त्व म्हणजे येथे उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत खेळाडूंना आगामी तिसऱ्या ‘पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग’ टी-२० स्पर्धेत खेळण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे स्थानिक क्रिकेटपटूंना आपले कौशल्य सिद्ध करण्यासाठी आणि पुढील मोठ्या स्पर्धेत स्थान मिळविण्यासाठी ही स्पर्धा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात क्रिकेटचा विकास व्हावा, स्थानिक क्रिकेट क्लब आणि खेळाडूंना सातत्याने स्पर्धात्मक सामने खेळण्याची संधी मिळावी, यासाठी संघटना प्रयत्नशील आहे. या स्पर्धेमुळे नवोदित आणि गुणवंत खेळाडूंना आपली गुणवत्ता दाखविण्यासाठी प्रभावी व्यासपीठ उपलब्ध होईल, असा विश्वास संघटनेचे सचिव राजू कोतवाल यांनी व्यक्त केला.

२ नाईन स्पोर्ट्स विरुद्ध एचएस पँथर्स उद्घाटनाचा सामना
स्पर्धेचा उद्घाटनाचा सामना २नाईन स्पोर्ट्स आणि एचएस पँथर्स या दोन संघांमध्ये रंगणार आहे. या सामन्याने स्पर्धेतील क्रिकेटच्या थराराला सुरुवात होणार असून, आगामी सामन्यांकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.


















Join Our Whatsapp Group