तळेगाव दाभाडे (Pclive7.com):- वाहनाचा हॉर्न वाजवून पुढे जाण्याचा प्रयत्न केल्याचा राग आल्याने चार अनोळखी मुलांनी एका विद्यार्थ्याला गाडीतून बाहेर ओढून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. यावेळी एका मुलाने डोक्यात जड वस्तू मारल्याने विद्यार्थी गंभीर जखमी झाला. ही घटना १७ ऑक्टोबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास तळेगाव दाभाडे येथील नूतन इंजिनिअरिंग कॉलेजसमोरील रस्त्यावर घडली.

श्रेयस बजरंग पवार (वय २२, विद्यार्थी) यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चार अनोळखी मुलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी श्रेयस पवार हा नूतन इंजिनिअरिंग कॉलेजचा विद्यार्थी असून, १७ ऑक्टोबर रोजी रात्री कॉलेजमधून चारचाकी वाहनाने घरी जात होता. कॉलेजसमोरील रस्त्यावर काही मुले घोळका करून उभी होती. त्यामुळे पवार यांनी हॉर्न वाजवून वाहन पुढे नेण्याचा प्रयत्न केला.

याचा राग आल्याने सुरुवातीला दोन मुले पवार यांच्या जवळ आली. ‘आम्ही गाववाले आहोत, तू आम्हाला हॉर्न देतो का?’ अशी विचारणा करत त्यांनी पवार यांना गाडीतून बाहेर ओढले. त्यानंतर आणखी दोन मुले तेथे आली. या चौघांनी मिळून पवार यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यातील एका मुलाने डोक्यात जड वस्तू मारल्याने श्रेयस गंभीर जखमी झाला आहे.

या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात चार अज्ञात मुलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक खामगळ करीत आहेत.
Tags: Talegaon Police



















Join Our Whatsapp Group