पथसंचलनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
पिंपळे सौदागर (Pclive7.com):- विजयादशमीच्या पावन पर्वानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य विजयादशमी पथसंचलनात भाजपचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. शिस्त, एकात्मता आणि राष्ट्रभक्तीचा संदेश देणाऱ्या या पथसंचलनामुळे परिसरात चैतन्यमय वातावरण निर्माण झाले होते.

आज मंगळवारी (दि.२० ऑक्टोबर) जी. के. गुरुकुल स्कूल येथून पथसंचलनाला सुरुवात झाली. नॅचरल आइसक्रीम कॉर्नर, डेफोडिल्स सोसायटी, काटे वस्ती, साई मंदिर आणि पाम ब्रिज सोसायटी या मार्गावरून संचलन पुन्हा जी. के. गुरुकुल स्कूल येथे येऊन संपन्न झाले. मार्गावर ठिकठिकाणी नागरिकांनी पुष्पवृष्टी करून स्वयंसेवकांचे स्वागत केले.

या पथसंचलनात सहभागी होताना भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राष्ट्रसेवा, शिस्त आणि संस्कारांच्या कार्याचे कौतुक केले. ते म्हणाले, “राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा केवळl एक विचार नसून राष्ट्रसेवा, अनुशासन आणि संस्कारांची जपणूक करणारी महान शाळा आहे. विजयादशमीच्या पवित्र दिवशी संघ स्वयंसेवकांच्या शिस्तबद्ध पथसंचलनात सहभागी होणे हा अभिमानाचा आणि ऊर्जा देणारा क्षण आहे. ‘देश प्रथम’ या भावनेने कार्य करणाऱ्या संघाचे विचार प्रत्येक नागरिकाला देशभक्तीची प्रेरणा देतात.”
या पथसंचलनाला परिसरातील नागरिक, महिला, तरुण आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे संचलनाचा उत्साह द्विगुणित झाला. शिस्तबद्ध संचलनातून राष्ट्रभक्ती, सामाजिक एकात्मता आणि संस्कारांचा संदेश देत विजयादशमीचा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.

















Join Our Whatsapp Group