आरक्षण क्र.४/११२ मधील जागा उपलब्ध करून देण्याची मागणी
पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे सौदागर परिसरातील वाढत्या लोकसंख्येची पाण्याची गरज लक्षात घेता, प्रभाग क्रमांक २८ मधील विकास आराखड्यातील आरक्षण क्रमांक ४/११२ (खेळाचे मैदान – PG) या आरक्षित जागेतून १५ ते २० गुंठे जागा उपलब्ध करून देत २.५ एमएलडी क्षमतेचा पाणीपुरवठा जलकुंभ उभारण्यात यावा, अशी मागणी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते तथा नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे.

पिंपळे सौदागर परिसरात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर नागरीकरण झाले आहे. या भागात मोठ्या निवासी इमारती आणि गृहप्रकल्पांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने लोकसंख्येतही मोठी वाढ होत आहे. परिणामी, पाणीपुरवठ्याची मागणी दिवसेंदिवस वाढत असून, भविष्यात नागरिकांना पुरेशा प्रमाणात आणि सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारणे गरजेचे असल्याचे काटे यांनी निवेदनात नमूद केले आहे.

परिसरातील वाढती पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी विकास आराखड्यातील आरक्षण क्रमांक ४/११२ मधून सुमारे १५ ते २० गुंठे जागा जलकुंभ उभारणीसाठी उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे. या ठिकाणी २.५ एमएलडी क्षमतेचा जलकुंभ उभारल्यास पाणीपुरवठ्याचे नियोजन अधिक सक्षम होण्यास मदत होईल. तसेच भविष्यातील वाढत्या लोकसंख्येची पाण्याची गरज भागविण्यासाठीही ही सुविधा उपयुक्त ठरेल, असे त्यांनी म्हटले आहे.

जागेची पाहणी करून कार्यवाही करण्याची मागणी
महापालिका प्रशासनाने संबंधित जागेची पाहणी करून नियमानुसार आवश्यक मंजुरी आणि तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करावी. तसेच जलकुंभ उभारणीसाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत संबंधित विभागाला आवश्यक आदेश द्यावेत, अशी विनंती नाना काटे यांनी आयुक्तांकडे केली आहे.

पिंपळे सौदागरमधील नागरिकांना भविष्यात पुरेसा व नियमित पाणीपुरवठा उपलब्ध व्हावा, यासाठी या मागणीवर महापालिका प्रशासन काय निर्णय घेते, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

















Join Our Whatsapp Group