पिंपरी (Pclive7.com):- महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड-किल्ल्यांची माहिती नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने दरवर्षी दिवाळीनिमित्त शहरस्तरीय भव्य ऐतिहासिक किल्ले स्पर्धा व प्रदर्शन आयोजित करण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे भोसरी विधानसभा सेवादल अध्यक्ष प्रविण पिंजण यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी महापौर रवि लांडगे, महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी आणि विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांना निवेदन दिले आहे.

पुणे महानगरपालिकेच्या उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागामार्फत गेल्या अनेक वर्षांपासून ऐतिहासिक किल्ले स्पर्धा व प्रदर्शन आयोजित केले जाते. यंदा या उपक्रमाचे ३२ वे वर्ष आहे. याच धर्तीवर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेनेही सन २०२६ पासून शहरस्तरीय किल्ले स्पर्धा सुरू करावी, अशी मागणी पिंजण यांनी केली आहे.
पिंपरी-चिंचवड हे औद्योगिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या विकसित शहर आहे. शहरातील शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्था, सार्वजनिक मंडळे आणि युवकांना या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळाल्यास ऐतिहासिक वारशाचे संवर्धन होण्यास मदत होईल. तसेच विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाची आवड, संशोधनवृत्ती, कलात्मकता, संघभावना आणि नेतृत्वगुण विकसित होतील, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

स्पर्धेसाठी स्वतंत्र आर्थिक तरतुदीची मागणी
महापालिकेच्या सांस्कृतिक व उद्यान विभागामार्फत दरवर्षी ही स्पर्धा आयोजित करावी. शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्था, सार्वजनिक मंडळे आणि नागरिकांसाठी स्वतंत्र स्पर्धा गट तयार करावेत. किल्ल्यांची ऐतिहासिक अचूकता, कलात्मक मांडणी, पर्यावरणपूरक साहित्य आणि माहितीपूर्ण सादरीकरण या निकषांवर परीक्षण करून विजेत्यांना रोख पारितोषिके, सन्मानचिन्हे व प्रमाणपत्रे द्यावीत, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. याशिवाय, स्पर्धेसाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात स्वतंत्र आर्थिक तरतूद करावी. नागरिकांना सहज पोहोचता येईल असे मध्यवर्ती ठिकाण निश्चित करावे. किल्ले तयार करण्यासाठी आवश्यक जागा, पाणी, वीज, स्वच्छता आणि सुरक्षा यांसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणीही करण्यात आली आहे.
आठही क्षेत्रीय कार्यालयांतून सहभागासाठी प्रोत्साहन द्या..
शहरातील आठही क्षेत्रीय कार्यालयांच्या कार्यक्षेत्रातील शाळा, विद्यार्थी आणि मंडळांना या उपक्रमात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. छत्रपती शिवाजी महाराजांचे गड-किल्ले, स्वराज्याचा इतिहास, गडसंवर्धन आणि पर्यावरण संरक्षण याविषयी माहिती देणारे विशेष प्रदर्शनही आयोजित करावे. या उपक्रमाला महापालिकेच्या वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये कायमस्वरूपी स्थान द्यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
ऐतिहासिक किल्ले तयार करण्याची परंपरा हा केवळ दिवाळीतील उपक्रम नसून महाराष्ट्राच्या इतिहासाशी नव्या पिढीला जोडणारी सांस्कृतिक चळवळ आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने या मागणीचा सकारात्मक विचार करून संबंधित विभागांना आवश्यक निर्देश द्यावेत, असे आवाहन प्रविण पिंजण यांनी केले आहे.
















Join Our Whatsapp Group