पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटी, पुरोगामी सामाजिक संघटना, संविधान प्रेमी नागरिक बंधू भगिनी यांच्या सहभागाने सांगवी येथील संविधान चौकातील संविधानाच्या प्रास्ताविका स्मारकाला कथितरीत्या विनापरवानगी हटवून त्याठिकाणी तोडफोड करण्यात आल्याच्या घटनेच्या निषेधार्थ उद्या, गुरूवार दिनांक 22 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून संविधान चौक, सांगवी येथे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करण्यात येणार आहे.

या प्रकरणी भाजपच्या नगरसेविका तृप्ती संतोष कांबळे, त्यांचे पती संतोष कांबळे आणि या कृत्यात सहभागी असल्याचा आरोप असलेल्या इतर संबंधित व्यक्तींवर कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी सातत्याने करण्यात येत आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या ‘ह’ प्रभाग अधिकाऱ्यांनी दिनांक १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सदर कृती बेकायदेशीर व महानगरपालिकेच्या परवानगीशिवाय झाल्याचे पोलीस आयुक्तांना लेखी कळविले आहे.
तरी देखील घटनेनंतर एक आठवडा उलटूनही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. प्रशासनाच्या या विलंबाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत, दोषींना कोणत्याही राजकीय दबावाखाली संरक्षण मिळता कामा नये आणि कायद्यापुढे सर्व समान आहेत, हे प्रशासनाने कृतीतून दाखवून द्यावे, अशी मागणी करण्यात येत आहे.

आंदोलनाच्या प्रमुख मागण्या..
१. संविधान चौक, सांगवी येथील संविधानाच्या प्रास्ताविका स्मारकाची पूर्वस्थितीत तात्काळ पुनर्स्थापना करावी.
२. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून जबाबदार व्यक्तींसह कथित कृत्यात सहभागी असलेल्या सर्व संबंधितांवर कायद्यानुसार तात्काळ गुन्हे दाखल करावेत.
३. भारतीय न्याय संहितेतील लागू असलेल्या संबंधित कलमांनुसार कारवाई करावी.
४. या प्रकरणात कोणताही राजकीय दबाव न घेता निष्पक्ष तपास करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी.
५. संविधानाच्या प्रतीकांचा, प्रास्ताविकेचा आणि सार्वजनिक स्मारकांचा अवमान होणार नाही, यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात.
संविधानाच्या सन्मानासाठी नागरिकांनी एकत्र यावे!
संविधान ही केवळ पुस्तकातील प्रस्तावना नाही, तर देशाच्या लोकशाहीचा, समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या मूल्यांचा मूलाधार आहे. संविधानाच्या प्रास्ताविका स्मारकाबाबत घडलेल्या या घटनेची निष्पक्ष चौकशी आणि कायद्यानुसार कारवाई होणे आवश्यक आहे. जोपर्यंत संविधानाच्या प्रास्ताविका स्मारकाची पुनर्स्थापना होत नाही आणि संबंधित प्रकरणात कायद्यानुसार ठोस कारवाई होत नाही, तोपर्यंत हे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांनी व्यक्त केला आहे.
तरी संविधानप्रेमी नागरिक, सामाजिक संघटना, पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते आणि लोकशाही मूल्यांवर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आंदोलनाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन नरेंद्र बनसोडे यांनी केले आहे.


















Join Our Whatsapp Group