पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले जात असतानाच, गाड्या धुण्यासाठी पाण्याचा वापर करण्यावरून चऱ्होली खुर्द येथील अभिमान श्री सोसायटीत दोन गटांमध्ये वाद झाल्याची घटना समोर आली आहे. नळाला पाइप लावून गाड्या धुण्यास विरोध केल्याने सुरू झालेला वाद मारहाणीपर्यंत पोहोचल्याचे आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात दोन्ही गटांकडून परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या असून, दोन स्वतंत्र गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २० ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास सोसायटीच्या पार्किंगमध्ये घडली.
पाणी वाचवण्याच्या मुद्द्यावरून वाद..
पहिल्या तक्रारीनुसार, सोसायटीतील काही रहिवासी बोअरवेलच्या पाण्याच्या नळाला पाइप लावून गाड्या धूत होते. सध्या पाणीटंचाई सुरू असल्याने सोसायटीच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर नळाला पाइप लावून गाड्या धुण्याऐवजी बादलीत पाणी घेऊन कमीत कमी पाण्यात गाड्या धुण्याचे आवाहन करण्यात आले होते. असे असतानाही पाइप लावून गाड्या का धुत आहात, असा जाब विचारल्याने वाद वाढल्याचे तक्रारीत नमूद आहे.
यावेळी शिवीगाळ करून हाताने तसेच बादलीने मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी राहुल माधवराव शिंपाळे (वय ३३) यांच्या तक्रारीवरून सचिन कोठावडे (वय ४६), विवेक कोठावडे (वय १८), कुणाल कोठावडे (वय २०), आशिष भालेराव (वय २८) आणि गणेश धातपांडे (वय २२) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रिक्षा धुण्यावरूनही मारहाणीचे आरोप
दरम्यान, दुसऱ्या तक्रारीनुसार, सचिन मच्छिंद्र कोठावडे हे सोसायटीच्या पार्किंगमध्ये बादलीतील पाण्याने आपली रिक्षा धूत असताना निलेश चव्हाण, राहुल शिंपळे, रविंद्र बदाणे, विवेक पवार आणि प्रांजय भालेराव यांनी त्यांना तसेच त्यांच्या पत्नी व मुलांना हाताने आणि बादलीने मारहाण करून शिवीगाळ केल्याचा आरोप आहे.
तसेच, तक्रार देण्यासाठी दुचाकीवरून पोलीस ठाण्याकडे निघालेल्या पत्नी आणि मुलाला अडवून सोसायटीचे मुख्य प्रवेशद्वार बंद केले, शिवीगाळ केली आणि धमकी देत रोखून धरल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीवरून निलेश चव्हाण, राहुल शिंपळे, रविंद्र बदाणे, विवेक पवार आणि प्रांजय भालेराव यांच्याविरोधात स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


















Join Our Whatsapp Group