पिंपरी (Pclive7.com):- घरकुल स्पाईन रोडवरील सर्व्हिस रोडवर आरंभ हॉटेलशेजारी पिण्याच्या पाण्याची मोठी पाइपलाइन फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया जात असल्याची बाब समोर आली आहे. गेल्या तीन तासांपासून पाइपलाइनमधून पाणी वाहत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेची तातडीने दखल घेऊन पाण्याची नासाडी थांबवावी आणि पाइपलाइन फुटण्यास जबाबदार असलेल्या संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणी मारुती गणपत जाधव यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.

शहरात अनेक भागांत नागरिकांना पाणीपुरवठ्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत असताना दुसरीकडे पिण्याच्या पाण्याची अशा प्रकारे नासाडी होत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. संबंधित ठेकेदाराच्या कामामुळे पाइपलाइन फुटली असल्यास या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जाधव यांनी केली आहे.
पाइपलाइन नेमकी कशामुळे फुटली, संबंधित काम करताना आवश्यक खबरदारी घेण्यात आली होती का आणि पाइपलाइन फुटल्यानंतर दुरुस्तीसाठी विलंब का झाला, याची चौकशी होणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.

महापालिका प्रशासनाने तातडीने घटनास्थळी अधिकारी आणि संबंधित कर्मचाऱ्यांना पाठवून पाइपलाइनची दुरुस्ती करावी. तसेच पाण्याची नासाडी त्वरित थांबवून चौकशीत दोषी आढळणाऱ्या ठेकेदारावर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
“नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले जाते. मात्र, पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन फुटून तासन्तास पाणी वाया जात असेल, तर संबंधित यंत्रणा काय करत आहे? या घटनेची तातडीने चौकशी करून जबाबदार ठेकेदारावर कारवाई झालीच पाहिजे,” अशी भूमिका मारुती जाधव यांनी मांडली.
या घटनेची महापालिका प्रशासन किती तत्परतेने दखल घेते, पाइपलाइनची दुरुस्ती कधी होते आणि संबंधितांवर काय कारवाई केली जाते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.


















Join Our Whatsapp Group