पिंपरी चिंचवड पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाची कारवाई
पिंपरी (Pclive7.com):- इन्स्टाग्रामवर बनावट अकाउंट तयार करून तरुणाला खासगी फोटोच्या माध्यमातून ब्लॅकमेल करत ५० हजार रुपयांची खंडणी मागणाऱ्या आणि त्याच्या मैत्रिणीकडे शारीरिक संबंधांची मागणी करणाऱ्या आरोपीला पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. हनुमान सुभाष खरात (वय ३५, मूळ रा. वरुडी, ता. सिंदखेडराजा, जि. बुलढाणा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून मोटारसायकल, मोबाईल, पाकीट, आधारकार्ड व इतर साहित्य असा एकूण १ लाख ४ हजार १३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने ‘Ruchita Nikarn93’ या नावाने इन्स्टाग्रामवर बनावट अकाउंट तयार केले होते. या अकाउंटवरून फिर्यादीला एका मुलीच्या खासगी अवयवांचा फोटो पाठवून स्वतःचा खासगी फोटो पाठवण्यास सांगण्यात आले. फिर्यादीने फोटो पाठवल्यानंतर आरोपीने दोघांमधील संभाषण एका अनोळखी मोबाईल क्रमांकाच्या व्हॉट्सॲपवर पाठवले.
त्यानंतर संबंधित इसमाने फिर्यादीला त्याचे खासगी फोटो कामाच्या ठिकाणच्या कार्यालयीन मोबाईलवर तसेच तो पार्टटाइम नोकरी करत असलेल्या ठिकाणी पाठवण्याची धमकी दिली. फोटो प्रसारित करायचे नसतील, तर ५० हजार रुपये द्यावे लागतील, अशी मागणी केली. पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकीही दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
मैत्रिणीलाही शारीरिक संबंधांसाठी धमकी..
आरोपीने फिर्यादीच्या मैत्रिणीच्या व्हॉट्सॲपवर संदेश पाठवून गणेशला त्रास होऊ द्यायचा नसेल, तर माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेव अथवा पैसे पाठव, अशी मागणी केली. तसे न केल्यास वायसीएम रुग्णालयात आपले अनेक मित्र असून ते गणेशला मारहाण करतील, अशी धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
याशिवाय, ‘Bhalchandra Aher’ या नावाच्या फेसबुक अकाउंटवरूनही फिर्यादीला संदेश पाठवून रुचिता नावाची मुलगी आणि तिचा मित्र ऐकत नसल्याचे तसेच ते सायबर पोलिसांकडे तक्रार करणार असल्याचे सांगून धमकावण्यात आले. या प्रकरणी संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

तांत्रिक तपासातून आरोपीचा शोध..
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन खंडणी विरोधी पथकाने अनोळखी मोबाईल क्रमांकाचा तांत्रिक तपास सुरू केला. या तपासातून आरोपी हनुमान सुभाष खरात याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून १ लाख ४ हजार १३० रुपये किमतीची मोटारसायकल, मोबाईल, पाकीट, आधारकार्ड आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले. पुढील कारवाईसाठी आरोपी व जप्त मुद्देमाल संत तुकारामनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध यापूर्वीही अशाच प्रकारचे दोन गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ही कारवाई खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक अमर राऊत, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक रमेश गायकवाड तसेच पोलीस कर्मचारी सुनील कानगुडे, प्रदीप पोटे, किरण जाधव, प्रदीप गोंडांबे, किशोर कांबळे, ज्ञानेश्वर कुऱ्हाडे आणि दादाभाऊ साबळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
खंडणीची मागणी झाल्यास पोलिसांशी संपर्क साधा..
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत कोणाकडे खंडणीची मागणी करण्यात आली असल्यास किंवा कोणी अशा प्रकारच्या गुन्ह्याचा बळी ठरले असल्यास त्यांनी खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा किंवा संत तुकारामनगर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस उपायुक्त (गुन्हे) रोहिदास पवार यांनी केले आहे.

















Join Our Whatsapp Group