११ लाख रुपयांची बक्षिसे; मॅरेथॉनमध्ये ६ हजारांहून अधिक धावपटू सहभागी होणार
पुणे (Pclive7.com):- फिटनेस, आरोग्य आणि सक्रिय जीवनशैलीला प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या ‘फेडरल बँक पुणे मॅरेथॉन २०२६’चे तिसरे पर्व येत्या रविवार, २२ नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे. ‘रन युअर रीजन’ (Run Your Reason) या प्रेरणादायी संकल्पनेसह होणाऱ्या या मॅरेथॉनचे आयोजन पुण्यातील पाषाण येथील पोलीस भरती मैदानावर करण्यात आले आहे. फेडरल बँक आणि स्ट्रायडर्स माइल्स प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे.

या मॅरेथॉनमध्ये अनुभवी धावपटूंसह फिटनेसप्रेमी, कॉर्पोरेट संघ, धावण्याचे गट आणि प्रथमच सहभागी होणाऱ्या धावपटूंना आपले कौशल्य आजमावण्याची संधी मिळणार आहे. यंदाच्या स्पर्धेत ६ हजारांहून अधिक धावपटू सहभागी होतील, अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे.

चार गटांत स्पर्धा
मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी ४२.१९५ किलोमीटर पूर्ण मॅरेथॉन, २१.०९७५ किलोमीटर हाफ मॅरेथॉन, १० किलोमीटर धावणे आणि ५ किलोमीटर धावणे असे चार प्रकार ठेवण्यात आले आहेत. विविध शर्यत प्रकारांमध्ये एकूण ११ लाख रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत.
स्पर्धेसाठी ऑनलाइन नोंदणी सुरू झाली असून, पूर्ण मॅरेथॉनसाठी १,१५० रुपये, हाफ मॅरेथॉनसाठी १,००० रुपये, १० किलोमीटर धावण्यासाठी १,८०० रुपये आणि ५ किलोमीटर धावण्यासाठी २,६०० रुपये प्रवेश शुल्क निश्चित करण्यात आले आहे. या शुल्कावर जीएसटी अतिरिक्त लागू असेल.

इच्छुक धावपटू स्ट्रायडर्स इव्हेंट्सच्या अधिकृत वेबसाइटवर नोंदणी करू शकतात.
वैयक्तिक ध्येयांसाठी धावण्याचे आवाहन
‘रन युअर रीजन’ ही संकल्पना प्रत्येक धावपटूच्या वैयक्तिक प्रेरणेचा आणि ध्येयाचा सन्मान करणारी आहे. आरोग्य सुधारणे, वैयक्तिक टप्पा गाठणे, स्वतःची क्षमता सिद्ध करणे किंवा एखाद्या सामाजिक कार्याला पाठिंबा देणे, अशा विविध कारणांसाठी धावपटूंना प्रोत्साहित करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
फेडरल बँकेचे मुख्य विपणन अधिकारी एम. व्ही. एस. मूर्ती म्हणाले की, पुणे मॅरेथॉन हे फिटनेस, शिस्त आणि चिकाटी अंगीकारण्यासाठी लोकांना प्रेरणा देणारे व्यासपीठ बनले आहे. यंदाच्या पर्वातून हजारो धावपटूंना एकत्र आणत आरोग्यदायी जीवनशैली आणि सामुदायिक सहभागाला अधिक चालना देण्याचा प्रयत्न आहे.
फेडरल बँकेचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि विभागीय प्रमुख ऋषी झा यांनीही मागील पर्वांना मिळालेल्या प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त केले. यंदाच्या संकल्पनेतून प्रत्येकाने स्वतःसाठी महत्त्वाच्या असलेल्या ध्येयासाठी धावावे, असे आवाहन त्यांनी केले.
स्ट्रायडर्स माइल्स प्रा. लि.चे संस्थापक आणि संचालक प्रफुल्ल उचिल यांनी सांगितले की, फेडरल बँकेसोबतची भागीदारी धावपटूंचा अधिक सक्षम आणि निरोगी समुदाय घडविण्यासाठी महत्त्वाची आहे. नवशिक्यांपासून अनुभवी धावपटूंपर्यंत सर्वांना दर्जेदार अनुभव देण्याचा आयोजकांचा प्रयत्न राहणार आहे.

















Join Our Whatsapp Group