पिंपरी (Pclive7.com):- क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती उत्सवानिमित्त अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या ओबीसी विभाग व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अंतर्गत सोमवार, दि.२६ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महात्मा फुले यांच्या सामाजिक समता, बंधुता, शिक्षण आणि सत्यशोधक विचारांचा जागर या कार्यक्रमातून करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ भूषविणार असून, उद्घाटन विधान परिषदेतील काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते होणार आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय ओबीसी विभागाचे उपाध्यक्ष तथा अखिल भारतीय काँग्रेसचे नेते भानुदास माळी, महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे माजी आमदार व ‘शिदोरी’चे संपादक अनंतराव मोहोड आणि पनवेल शहर काँग्रेसच्या अध्यक्षा श्रुती म्हात्रे उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते हनुमंत पवार यांचे यावेळी मार्गदर्शन होणार आहे.

महात्मा जोतिराव फुले यांनी वंचित, शोषित आणि बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी केलेले कार्य, स्त्रीशिक्षणासाठी दिलेले योगदान तसेच सामाजिक समता आणि शिक्षणाच्या प्रसारासाठी केलेले प्रयत्न यांचा गौरव या कार्यक्रमातून करण्यात येणार आहे. महात्मा फुले यांच्या विचारांचा आणि सामाजिक कार्याचा वारसा पुढे नेणाऱ्या मान्यवरांना ‘महात्मा फुले कार्य गौरव पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, महात्मा फुले विचारांचे अनुयायी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. महात्मा फुले यांच्या सत्यशोधक, समतावादी आणि पुरोगामी विचारांचा प्रसार करून नव्या पिढीला त्यांच्या कार्याची प्रेरणा मिळावी, हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.

कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सोमनाथ शेळके, विष्णुपंत नेवाळे आणि संदेश नवले यांच्यासह महात्मा फुले द्विशताब्दी जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. या जयंती उत्सवाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.


















Join Our Whatsapp Group