पिंपरी (Pclive7.com):- राष्ट्रीय एकता, देशाची अखंडता आणि अंमली पदार्थांविरोधात जनजागृतीचा संदेश घेऊन दक्षिण भारतातून सुरू झालेल्या राष्ट्रीय एकता बाईक रॅलीचे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत उत्साहपूर्ण वातावरणात भव्य स्वागत करण्यात आले. रावेत येथील डी. वाय. पाटील महाविद्यालयाच्या परिसरात आयोजित कार्यक्रमात ढोल-ताशांचा गजर, पुष्पवृष्टी आणि जल्लोषात विविध राज्यांतून आलेल्या बाईक रायडर्सचे स्वागत करण्यात आले.

पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या माध्यमातून राष्ट्रीय एकता, देशाची अखंडता, बंधुभाव आणि नशामुक्त भारताचा संदेश युवकांपर्यंत पोहोचविण्यात आला.
राष्ट्रीय एकता बाईक रॅलीचे डी. वाय. पाटील महाविद्यालय, रावेत येथे आगमन होताच उपस्थितांनी ढोल-ताशांच्या गजरात रायडर्सचे स्वागत केले. बाईक रायडर्सवर पुष्पवृष्टी करून त्यांचा उत्साह वाढविण्यात आला. या स्वागतामुळे संपूर्ण परिसरात राष्ट्रीय एकता आणि नशामुक्त भारताचा संदेश देणारे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

यावेळी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या वतीने पोलीस सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर यांच्या हस्ते विविध राज्यांतून आलेल्या बाईक रायडर्सना स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. या राष्ट्रीय एकता बाईक रॅलीमध्ये पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील तब्बल १०० बाईक रायडर्सनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाला पोलीस सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) रोहिदास पवार, पोलीस उपआयुक्त (परिमंडळ-१) संदीप आटोळे, पोलीस उपआयुक्त (परिमंडळ-२) प्रदीप जाधव, पोलीस उपायुक्त (वाहतूक) विक्रांत देशमुख, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे-२) सचिन कदम यांच्यासह अंमली पदार्थविरोधी पथकातील अधिकारी व अंमलदार, विविध राज्यांतून आलेले बाईक रायडर्स आणि महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमानंतर पोलीस सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून राष्ट्रीय एकता बाईक रॅलीला पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आले. दक्षिण भारतातून सुरू झालेली ही राष्ट्रीय एकता बाईक रॅली देशाच्या विविध भागांतून प्रवास करत असून, ३१ ऑक्टोबर रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त केवडिया, एकतानगर येथे पोहोचणार आहे. राष्ट्रीय एकता, देशाची अखंडता आणि बंधुभावाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्यासोबतच युवा पिढीमध्ये अंमली पदार्थांविरोधात जनजागृती करणे हा या रॅलीचा प्रमुख उद्देश आहे.

पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमाला डी. वाय. पाटील महाविद्यालय, रावेत येथे मिळालेला उत्स्फूर्त आणि भव्य प्रतिसाद हा राष्ट्रीय एकता व नशामुक्त भारताच्या संदेशाला युवकांकडून मिळणाऱ्या सकारात्मक प्रतिसादाचे प्रतीक ठरला.
“अंमली पदार्थांना नाही, जीवनाला हो!”
हा संदेश देत पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वतीने राष्ट्रीय एकता बाईक रॅलीतील सर्व रायडर्सना पुढील प्रवासासाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.


















Join Our Whatsapp Group