पिंपरी (Pclive7.com):- बावधन पोलीस ठाण्याच्या हद्दीत महाळुंगे गावात एका अल्पवयीन मुलीवर चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि.२३) दुपारी सव्वादोन वाजण्याच्या सुमारास घडली. या हल्ल्यात मुलगी जखमी झाली असून, तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या तिची प्रकृती स्थिर असून उपचार सुरू आहेत.

पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, महाळुंगे गावातील एका शाळेची सहल १७ आणि १८ ऑक्टोबर रोजी पाचगणी-महाबळेश्वर येथे गेली होती. या सहलीदरम्यान एका कार्यक्रमात मुली डान्स करत असतानाचा व्हिडिओ इयत्ता नववीत शिकणाऱ्या एका विधिसंघर्षित बालकाने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पाठवला होता. या व्हिडिओवरून संबंधित मुलांमध्ये वाद झाला होता. त्यानंतर त्या मुलाला व्हिडिओ डिलीट करावा लागला होता.

याच वादाचा राग मनात धरून संबंधित मुलाने आज दुपारी मुलीवर चाकूने हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात मुलगी जखमी झाली असून, तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दरम्यान, बावधन पोलिसांनी जखमी मुलीचा जबाब नोंदवला असून, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. हल्ला केल्याचा आरोप असलेल्या विधिसंघर्षित बालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
या घटनेचा पुढील तपास बावधन पोलीस करत असून, हल्ल्यामागील नेमकी कारणे आणि घटनेचे इतर तपशील तपासातून स्पष्ट होणार आहेत.


















Join Our Whatsapp Group