पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहरातील वायसीएम रुग्णालयात डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालत गोंधळ घालणाऱ्या तीन तरुणांनी पोलीस हवालदाराला धक्काबुक्की करत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपींनी पोलीस हवालदाराची गचुंडी धरून त्यांना बाजूला ढकलले. तसेच हातातील जाड लोखंडी कड्याने मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. या घटनेत पोलीस हवालदार अमोल शिंदे गंभीर जखमी झाले असून, याप्रकरणी संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

ही घटना शुक्रवार आणि शनिवारच्या मध्यरात्री साडेचारच्या सुमारास वायसीएम रुग्णालयात घडली. वैभव साळुंखे, कुशल गोयल आणि सोहेल शेख हे तिघे आपल्या मित्राला उपचारासाठी रुग्णालयात घेऊन आले होते. यावेळी आरोपींनी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कामात अडथळा निर्माण करत आरडाओरडा करून गोंधळ घातल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

रुग्णालयात कर्तव्यावर असलेले पोलीस हवालदार अमोल शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आरोपींना शांत राहण्यास सांगितले. मात्र, समज देण्याचा राग मनात धरून आरोपींनी पोलिसांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर पोलिसांना धक्काबुक्की करत शिवीगाळ करण्यात आली.
आरोपींनी पोलीस हवालदार अमोल शिंदे यांच्या गळ्याला पकडून त्यांना बाजूला ढकलले. तसेच हातातील जाड लोखंडी कड्याने मारहाण करण्याच्या उद्देशाने त्यांच्या पायावर आणि डोळ्याजवळ गंभीर दुखापत केल्याची तक्रार आहे. आरोपींनी पोलिसांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

रुग्णालयात उपचार सुरू असताना डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांशी गोंधळ घालणाऱ्या आरोपींनी पोलिसांनाच लक्ष्य केल्याने या घटनेने खळबळ उडाली आहे. शासकीय कामात अडथळा आणणे, धक्काबुक्की, शिवीगाळ आणि जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तिघांविरोधात संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी वैभव साळुंखे, कुशल गोयल आणि सोहेल शेख या तिघांना पोलिसांनी अटक केली असून, पुढील तपास संत तुकारामनगर पोलीस करत आहेत.



















Join Our Whatsapp Group