प्रशासनाने तातडीने उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
निगडी (Pclive7.com):- साईनाथ नगर येथील अंतर्गत मुख्य रस्त्यावर वाहनांचा वेग नियंत्रित करण्यासाठी आणि नागरिकांसह शाळकरी मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तातडीने गतिरोधक (स्पीड ब्रेकर) बसवण्यात यावेत, अशी मागणी शिवसेना उपनेत्या तथा पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती सदस्य सुलभा उबाळे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. याबाबत त्यांनी आयुक्तांना निवेदन दिले आहे. नुकतच हनुमंत महादेव शिंदे या व्यक्तीचा येथील रस्त्यावर अपघातात मृत्यू झाला आहे. महापालिका प्रशासनाने तातडीने येथे उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही उबाळे यांनी दिला आहे.

साईनाथ नगर येथील अंतर्गत मुख्य रस्ता हा निगडी परिसराला जोडणारा महत्त्वाचा मार्ग असून, या रस्त्यावरून दररोज मोठ्या प्रमाणात दुचाकी आणि चारचाकी वाहनांची ये-जा सुरू असते. परिसरात दाट लोकवस्ती असून, नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि शाळकरी मुले मोठ्या संख्येने या रस्त्याचा वापर करतात. मात्र, वाहनांच्या वेगावर नियंत्रण नसल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. नुकतच येथे अपघातात एका व्यक्तीला आपला जीव गमववा लागला असल्याचे उबाळे यांनी निवेदनात म्हटले आहे.
या रस्त्यावर गेल्या काही महिन्यांत अनेक छोटे-मोठे अपघात घडले असून, त्यामध्ये नागरिक जखमी झाले आहेत. तसेच, बेदरकार वाहनचालकाच्या धडकेत काही काळापूर्वी एका चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आणि संतापाचे वातावरण असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

अपघात रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करा
नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होऊ नये आणि वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवता यावे, यासाठी साईनाथ नगरमधील मुख्य रस्त्याची तसेच अंतर्गत चौकांची तातडीने पाहणी करण्यात यावी. सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या ठिकाणी शास्त्रीय मानदंडांनुसार गतिरोधक किंवा रंबल स्ट्रिप्स बसवण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच, रात्रीच्या वेळी वाहनचालकांना गतिरोधक स्पष्टपणे दिसावेत यासाठी त्यावर रिफ्लेक्टिव्ह पांढरे पट्टे मारण्यात यावेत आणि योग्य ठिकाणी इशारा फलक लावण्यात यावेत, असेही निवेदनात म्हटले आहे.

नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत संवेदनशील असून, प्रशासनाने कोणतीही नवीन दुर्घटना घडण्यापूर्वी तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी आग्रही मागणी सुलभा उबाळे यांनी केली आहे.


















Join Our Whatsapp Group